पालिका करणार सव्वा आठ कोटी खर्च
मुंबई ( प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी टर्मिर्नस(सीएसटी)च्या इमारतीच्या धर्तीवरच पालिकेच्या ऐतिहासीक इमारतीवर रंगीत प्रकाश योजना करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी सुमारे सव्वा आठ कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसटीप्रमाणेच आता पालिकेची ऐतिहासीक इमारतही रोषणाईन झळकणार आहे. बुधवार १४ डिसेंबरच्या स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे
पालिका मुख्य इमारतीला शोभा असणारी रंगीत प्रकाश योजना करण्यासंदर्भात पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मंजुरी दिली आहे. त्यासाठी प्रकल्प व्यस्थापन सल्लागार म्हणून आभा नारायण लाभा असोसिएटस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिका मुख्यालयाच्या जुन्या व विस्तारीत इमारतीच्या दर्शनी भागावर वेगवेगळया रंगछटेची प्रकाश योजना करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. मेसर्स वॉच डॉग सिक्युरिटी यांची कमी दराची निविदा प्राप्त झाली असून त्यांना कंत्राट देण्यास मंजुरी देण्यासाठी हा विषय स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. सदर कामाची देखभाल दुरूस्ती ही पाच वर्षाची असून त्यासाठी कंत्राटदाराची जबाबदारी राहणार आहे. तसेच महापालिकेच्या इमारतीशिवाय सर फिरोजशहा यांच्या पुतळयासही प्रकाशमान करण्यात येणार असून, सॉफटवेअर प्रोगामिंगच्या साहयायाने विद्युत दिव्यांचा चक्रीय पध्दतीने रंग बदलणार आहे.