रस्त्याची वा भिंतीची जाडी, रंगाचे थर, काचेची जाडी मोजणारी उपकरणे
मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई महापालिकेद्वारे करण्यात येणारी अभियांत्रिकी विषयक कामे निर्धारित अटी व शर्तींनुसार गुणवत्तापूर्ण पद्धतीने झाली आहेत की नाही, हे मानवीय हस्तक्षेपाविना तपासता यावे यासाठी महापालिका लवकरच अत्याधुनिक स्वरुपाच्या दक्षता विषयक उपकरणांची खरेदी करणार आहे. या अत्याधुनिक उपकरणांमुळे रस्ता किंवा भिंत न तोडता त्यातील कॉन्क्रीटची जाडी मोजता येणार आहे. तसेच एखाद्या इमारतीच्या स्लॅब किंवा पिलरमध्ये किती सळया आहेत व त्यांची गुणवत्ता काय आहे याची तपासणी देखील केवळ हे उपकरण त्या स्लॅबवर किंवा पिलरजवळ ठेऊन करता येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता मनोहर पवार यांनी दिली आहे.
महापालिकेद्वारे घेण्यात येणारी ही सर्व अत्याधुनिक उपकरणे लेझर, अल्ट्रासाऊण्ड, स्पेक्ट्रोग्राफ, चुंबकीय लहरी (Magnetic Tech.), इन्फ्रारेड, मोशन सेन्सर, ऍटॉमिक रेडीओऍक्टीव्ह यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहेत. महापालिकेच्या दक्षता खात्याद्वारे ज्या अत्याधुनिक उपकरणांची खरेदी प्रस्तावित करण्यात आली आहे.
कॉन्क्रीट गेज (Concrete Gauge): या उपकरणामुळे एखाद्या रस्त्याच्या वा इमारतीच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या कॉन्क्रीटची जाडी किती आहे, हे मोजता येणार आहे. विशेष म्हणजे ही जाडी मोजण्यासाठी कोणत्याही प्रकारची तोडफोड करावी लागणार नाही. तर केवळ 'कॉन्क्रीट गेज' हे उपकरण रस्त्यावर किंवा भिंतीवर ठेवल्यावर क्षणार्धात संगणकीय पद्धतीने रस्ता वा भिंती मध्ये असलेल्या कॉन्क्रीटची जाडी कळू शकणार आहे.
डिजीटल थर्मेामीटर (Digital Thermometer): बांधकामाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने कोल्डमिक्स, हॉटमिक्स किंवा रेडिमिक्स याप्रकारातील कॉन्क्रीटचे विशिष्ट तपमान सातत्याने स्थिर ठेवणे आवश्यक असते. रस्ते बांधकामात देखील कॉन्क्रीट वा डांबराचे विशिष्ट तपमान स्थिर ठेवणे गुणवत्तेसाठी आवश्यक असते. बांधकाम सुरु असताना बांधकाम साहित्याची गुणवत्ता देखील योग्यप्रकारे तपासली जावी यासाठी ज्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात त्यामध्ये बांधकाम साहित्याच्या तापमानाची देखील तपासणी केली जाते. हे तपमान मोजण्यासाठी 'डिजीटल थर्मेामीटर' सारखे अत्याधुनिक उपकरण उपयोगी आहे.
डिस्टन्स लेझर मीटर (Distance Laser Meter): एखाद्या खोलीचे किंवा रस्त्याचे मोजमाप घ्यावयाचे झाल्यास ते मोजपट्टी न वापरता या उपकरणाच्या सहाय्याने अत्यंत कमी वेळात व अचूकपणे घेता येऊ शकते. या उपकरणामुळे एखाद्या खोलीची लांबी, रुंदी व उंची मोजता येत असल्याने इमारत बांधकाम हे निर्धारित प्रकारे झाले असल्याची तसेच चटई क्षेत्राच्या मर्यादेतच बांधकाम झाले असल्याची तपासणी 'डिस्टन्स लेझर मीटर' उपकरणाद्वारे करता येऊ शकते.
कोरोजन डिटेक्टर (Corrosion Detector): जुन्या इमारतींच्या पिलर / बीम किंवा स्लॅबमध्ये असणा-या सळया गंजल्या आहेत का? व गंजल्या असल्यास त्या किती प्रमाणात गंजल्या आहेत?, याची तपासणी या उपकरणाद्वारे करता येऊ शकते. 'कोरोजन डिटेक्टर' इमारतीच्या संरचनात्मक भक्कमतेची माहिती तात्काळ व तोडफोडीविना मिळू शकते.
स्प्लिट टेस्ट / बॉण्ड टेस्ट यंत्र (Split Test / Bond Test): या उपकरणामुळे बांधकामादरम्यान वापरण्यात आलेले सिमेंट कॉन्क्रीट व प्लॅस्टर यांच्या एकरुपतेची गुणवत्ता तपासण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो.
एल्कोमीटर (Elcometer): एखाद्या भिंतीवर मारलेल्या रंगाच्या थराची जाडी किती आहे किंवा एखाद्या उपकरणाला करण्यात आलेले गॅल्व्हेनायझेशन, आयोनायझेशन याची प्रतवारी कशी आहे, याची तपासणी या 'एल्कोमीटर' या उपकरणाच्या आधारे करता येऊ शकते.
मॉइश्चर मीटर (Moisture Meter): एखाद्या भिंतीमध्ये गळती (लिकेज) आहे का व असल्यास किती प्रमाणात आहे? याची तपासणी 'मॉइश्चर मीटर' उपकरणाद्वारे करता येऊ शकते. तसेच लाकूड वा तत्सम इमारत बांधकाम साहित्य यात आर्द्रतेचे प्रमाण किती आहे? याचीही माहिती उपकरणाद्वारे मिळू शकते.
प्रोफोस्कोप (Profoscope): एखाद्या इमारतीच्या पिलर / बीम वा स्लॅबमध्ये किती सळया वापरण्यात आल्या आहेत, सळयांमधील अंतर किती आहे? तसेच वापरण्यात आलेल्या सळयांची जाडी किती आहे, याची तपासणी या उपकरणाद्वारे करता येणार आहे. या उपकरणाद्वारे तपासणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तोडफोड करावी लागणार नाही, तर केवळ 'प्रोफोस्कोप' स्लॅबवर किंवा पिलरवर ठेवल्यानंतर त्या स्लॅब किंवा पिलरच्या आत मध्ये काय आहे, याची संगणकीय प्रतिमा आवश्यक त्या अभियांत्रिकी तपशीलासह मिळू शकणार आहे.
अल्ट्रासोनिक थिकनेस गेज (Ultrasonic Thickness Gauge): बांधकामा दरम्यान अंतर्गत स्तरावर वापरण्यात आलेल्या मेटल शीट, लॅमिनेशन, काचेची जाडी यासारख्या बाबींची तपासणी या उपकरणाद्वारे करता येणार आहे. या उपकरणाद्वारे तपासणी केल्यानंतर मेटल शीट, लॅमिनेशन, काच, प्लायवूड यांची जाडी क्षणार्धात प्राप्त होऊ शकणार आहे.