मुंबई: ११ डिसेंबर
मुंबईतील कुर्ला परिसरातील ज्या शाळेत मुस्लिम शिक्षिकेला शिकवताना बुरखा न वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्या शाळेची मान्यता रद्द करा, अशी मागणी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.अबु असीम आझमी यांनी केली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून शिक्षणासोबतच प्रत्येक बाबीचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या देशात प्रत्येकाला आपल्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला असून त्या अधिकारावर गदा आणणे योग्य नसल्याचे सांगत आझमी यांनी या प्रकरणाबाबत विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे सांगितले.कुर्ला परिसरातील एका शाळेत शबिना खान नाझनीन यांना त्यांच्या वरिष्ठांनी शाळेत शिकवताना बुरखा किंवा हिजाब परिधान करू नये, अशा सुचना दिल्या होत्या.वरिष्ठांच्या या सुचनेमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत नाझनीन यांनी थेट आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे. त्यांच्या राजिनाम्याबाबत अजूनही शाळा व्यवस्थापनाने कोणताही निर्णय घेतलेला नसून येत्या आठवड्यात तो घेतला जाणार असल्याचे शाळा व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र हा प्रकारच अतिशय निंदनिय असून नाझनीन यांना दिलेल्या आदेशामागचे खरे कारण काय आहे? याचा खुलासा शाळा व्यवस्थापनाने करावा अशी मागणी मा. अाझमी यांनी केली आहे. तसेच या विरोधात सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आपण आवाज उठवणार असून या शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले.
याबाबत पुढे बोलताना मा. आझमी म्हणाले की, जेव्हा पासून केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आले आहे, तेव्हा पासून धर्मवाद्यांनी उच्छाद मांडला आहे.मध्यंतरी महापालिकेच्या शाळांमध्ये सुर्यनमस्कारांची सक्ती करण्यात आली होती.या देशात जन गण मन म्हणण्याची सुद्धा सक्ती करता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असताना सुर्यनमस्काराची सक्ती का?असा सवाल करत मा. आझमी म्हणाले की, शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा हा प्रकार असून तो कदापि खपवून घेतला जाणार नाही. तसेच शाळांमध्ये मुले घडवली जातात, तिथेच जर त्यांच्यावर असे द्वेषाचे संस्कार होणार असतील, तर देश पुढे कसा जाईल, असा उद्वीग्न सवाल मा. आझमी यांनी केला.