नोटाबंदीनंतरही काही लोकांकडे नव्या नोटांच्या स्वरूपात कोट्यवधी रुपये कसे? - आ. अबु आझमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 December 2016

नोटाबंदीनंतरही काही लोकांकडे नव्या नोटांच्या स्वरूपात कोट्यवधी रुपये कसे? - आ. अबु आझमी

मुंबई: ११ डिसेंबर
नोटाबंदीनंतर नव्या नोटांचा प्रचंड तुटवडा असताना देशभरातील विविध कारवायांमध्ये आतापर्यंत तब्बल ३४ कोटींची एकूण रक्कम नव्या चलनी नोटांच्या स्वरूपात जप्त करण्यात आली आहे. नव्या नोटांच्या तुटवड्यामुळे बँका आणि एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर या नव्या चलनी नोटा त्यांना कुठून मिळाल्या याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबु असीम आझमी यांनी केली आहे. तसेच कारवाई झालेले बरेचसे लोक हे भाजपशी संबंधीत असून भाजपने त्यावर खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
गेल्या महिन्यात पंतप्रधानांनी हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वसामान्य लोक आणि गरिबांना प्रचंड त्रास होत आहे. हातावर पोट असलेल्या अनेक जणांचे रोजगार नष्ट झाल्याने नाईलाजास्तव त्यांना मुंबईहून गावाची वाट घरावी लागत आहे. सर्वसामान्यांना बँकेत पैसे असूनही पैसे मिळणे मुश्किल झाले आहे. छोटेमोठे व्यापार ठप्प झाले आहेत. बाजारपेठेत मंदीचे वातावरण आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे मात्र काही लोकांकडे कोट्यवधी रुपये नव्या नोटांच्या स्वरूपात सापडत आहेत. यापैकी बरेच जण हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाजपशी संबंधित असल्याची बाबही समोर आली आहे. असे असताना भाजप सरकार यावर गप्प का, असा सवाल मा. आझमी यांनी केला. तसेच मोदी उत्तर प्रदेशातील आपल्या प्रत्येक निवडणुक प्रचारसभेत आपल्या नोटबंदीच्या निर्णयाचे स्वत:च कौतुक करत आहेत. मात्र कोट्यवधी रुपयांच्या नव्या नोटांची बंडले जप्त केली जात असताना त्याबाबत मोदी मात्र आपल्या सभांमध्ये अवाक्षरही का काढत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. अशा काळाबाजाऱ्यांवर कारवाई न करण्यामागे काय कारणे आहेत याचा खुलासा भाजपने करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Post Bottom Ad