देशातील आर्थिक हालचाली निर्धारित करण्यात कर्जाचा वृद्धीदर महत्त्त्वाचा आहे. नोटाबंदीमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने कर्जाची मागणी घटली आहे. बडोदा बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, किरकोळ क्षेत्रातील ग्राहक किमती कमी होण्याची वाट पाहत आहे. गृह आणि वाहन कर्जाची वाढ जवळपास सपाट झाली आहे. कर्जाच्या परतफेडीवरही मोठा परिणाम झाला आहे. बँकांना अतिरिक्त ठेवी आणि कोशीय लाभ मिळेल, तरीही तिसऱ्या तिमाहीत बँकांना तात्पुरत्या मंदीचा सामना करावा लागेल.
वीजेची मागणी ६ टक्क्यांनी घटली
नोटाबंदीमुळे सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात वीजेची मागणी ६ टक्क्यांनी घटली आहे. केंद्रीय वीज प्राधिकरणाने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. नोटाबंदीमुळे मध्यम, सुक्ष्म आणि छोट्या उद्योजकांचे धंदे बसले आहेत. वीजेवर अवलंबून असलेल्या वाहन, हॉटेल आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रांनाही नोटाबंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी वीजेची मागणी कमी केली आहे.