चित्रपट निर्मात्यांना सरकारपेक्षा राज ठाकरे अधिक महत्वाचे वाटत असतील तर हे राज्य सरकारचे अपयश - आ.अबु आझमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 December 2016

चित्रपट निर्मात्यांना सरकारपेक्षा राज ठाकरे अधिक महत्वाचे वाटत असतील तर हे राज्य सरकारचे अपयश - आ.अबु आझमी

मुंबई: १२ डिसेंबर
आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन सुरळीत व्हावे म्हणून राज्य सरकारकडे सुरक्षा मागण्यापेक्षा निर्माते राज ठाकरेंना भेटत आहेत. चित्रपट प्रदर्शनाच्या बाबतीत हे सरकार आपल्याला सुरक्षा देऊ शकत नाहीत, असे जर निर्मात्यांना वाटत असेल तर हे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.अबु असीम आझमी यांनी केली आहे. आपल्या रईस या चित्रपटाच्या प्रदर्शापुर्वी सुप्रसिद्ध सिनेस्टार शाहरुख खान यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावर ते बोलत होते.
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण करण्यात हे सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहे. आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सिनेमाचे निर्माते जर राज ठाकरेंना भेटत असतील, तर या निमित्ताने एक चुकीचा पायंडा पडत असल्याचे मत मा.आझमी यांनी व्यक्त केले. यापुर्वीही "ऐ दिल है मुश्किल' च्या वेळी तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे आणि करण जोहर यांच्यादरम्यान मध्यस्थी केली होती.या सर्व घटना पाहता राज्य सरकार राज ठाकरेंना पाठिशी घालत आहे, ही बाब स्पष्ट आहे. समाजवादी पार्टी या प्रकाराचा निषेध करते. कलाकारांना बोलावून त्यांना जबरदस्तीने एखाद्या संस्थेला किंवा सेना दलासाठी निधी देण्यास भाग पाडणे म्हणजे खंडणीखोरीच असल्याची टीकाही आझमी यांनी केली.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत एमआयएमचे कितपत आव्हान वाटते,या प्रश्नावर बोलताना आझमी म्हणाले की, एमआयएमचा फटका समाजवादी पार्टीपेक्षा काँग्रेसला सर्वाधिक बसेल, असा आमचा अंदाज आहे. तसेच भाजप आणि एमअायएम परस्पर विरोधी विधाने करून प्रचार आपल्याभोवतीच केंद्रीत करत असल्याचे सांगत मा. आझमी म्हणाले की, भाजप आणि एमआयएम यांची छुपी युती असू शकते. तसेच एमआयएमकडे इतका पैसा आला कुठून याचीही चौकशी व्हायला हवी. आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना मा. आझमी पुढे म्हणाले की, मुंबई महापालिकेत आम्ही ११२ ठिकाणी निवडणुक लढण्याची तयारी केली आहे.मात्र ओबीसी आरक्षणामुळे अनेक ठिकाणी उमेदवार मिळणे कठीण होत आहे. मात्र या सर्व अडचणींवर मात करून येत्या महापालिका निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Post Bottom Ad