नागपूर, दि. 13 : मुंबईतील भिक्षेकरी मुलांसाठी ‘सिग्नल शाळा’ सुरु करण्याचा विषय विचाराधीन आहे. याबाबत ठाणे महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती घेऊन असा उपक्रम मुंबईत राबविण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. मुंबईतील काही विकलांग भिक्षेकरु मुलांना पळवून जमीनदारांना विकले जात असल्याबाबतचा प्रश्न सदस्य अमित साटम यांनी विधानसभेत विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुंबईतील काही विकलांग भिक्षेकरी मुलांना पळवून श्रीगोंदा येथील जमीनदारांना विकले जात असल्याबाबत लोणी व्यंकनाथ शिवारातील व शिरसगाव बोडखा (ता. श्रीगोंदा) येथील नऊ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु असल्याची माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्याचबरोबर, या मुलांच्या शिक्षणासाठी शासन धोरण ठरविण्यासाठी सर्व संबंधित विभागांची बैठक घेण्यात येऊन समिती नेमण्यात येईल, अशी माहिती केसरकर यांनी यावेळी दिली.
मुंबई शहरातील भिक्षेकरी गृहाचा भूखंड विकासकाला दिल्याबद्दल तसेच ठाणे महानगरपालिकेने भिक्षेकरी मुलांसाठी पूलाखाली ट्राफिक सिग्नलजवळ शाळा सुरु केली आहे. हा उपक्रम मुंबई शहरात राबविणार काय, याबाबतचा प्रश्न ॲड. आशिष शेलार यांनी विचारला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, याबाबतची माहिती घेऊन उचित कार्यवाही करण्यात येईल. त्याचबरोबर ठाणे महापालिकेच्या उपक्रमाची माहिती घेऊन त्याबाबतचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य योगेश सागर, ॲड. आशिष शेलार, मनीषा चौधरी आदींनी सहभाग घेतला