मुंबई - भांडुप एस वार्डमधील महानगरपालिकेतील तीन कर्मचार्यांना त्यांच्याच कार्यालयात सात हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना मंगळवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. अटक आरोपींमध्ये ज्युनिअर ओव्हरसीअर रिजवान हसन पटेल, सुपरवायझर शकील अहमद काजम शेख आणि कामगार मुकेश तुलसी वडोदरा यांचा समावेश आहे.
एका एनजीओने सादर केलेले दत्तक वस्ती योजनेंतर्गत प्रलंबित बिल करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. यातील तक्रारदार एका एनजीओमध्ये अध्यक्ष पदावर काम करीत असून त्यांना दत्तक वस्ती योजनेंतर्गत पालिकेने एक कंत्राट दिले होते. या कामाची सविस्तर खर्चाचा तपशील असलेली फाईल त्यांनी एस वार्डमध्ये सादर केली होती. मात्र संबंधित बिल मंजूर करण्याची प्रक्रिया पुढे जात नव्हती. त्यामुळे त्यांनी तेथील अधिकारी रिजवान पटेल आणि शकील शेख यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बिलाची फाईल पुढे पाठविण्यासाठी त्यांच्याकडे सात हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात या तिन्ही अधिकारी आणि कर्मचार्यांविरुद्ध तक्रार केली. त्यानुसार गुन्हा नोंदवून मंगळवारी दुपारी या तिघांनाही त्यांच्याच कार्यालयात लाचेची सात हजार रुपयांची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले.