मुंबई : शिवडी येथील सेकंड ऑक्टोबर मराठी शाळेच्या जागेवर एका बिल्डराने कब्जा केल्याचा आरोप शिक्षण समिती सदस्य शिवनाथ दराडे यांनी केला आहे. सध्या ही शाळा बाजूलाच एका इमारतीत छोट्यांच्या बालवाडीच्या जागेत भरत असली तरी एकूण पटापैकी निम्म्यापेक्षा अधिक मुलांनी शाळाच सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार दराडे यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे समोर आणला आहे. या प्रकाराविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्त करत सभा तहकुबी मांडली. याबाबत संबंधित विकासक व या प्रकरणी दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणीही करण्यात आली.
एफ दक्षिण विभागातील ही मराठी शाळा झोपडपट्टी पुनर्वसनेत समाविष्ट करण्यासाठी विकास नियोजन विभागाच्या पत्रानुसार महापालिकेने संमती दिली. त्यानंतर ही शाळा संबंधित विभागाने परिशिष्ट २ मध्ये समावेश केली. मात्र, त्यापूर्वी २00९ साली या शाळेचा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत नव्हता. अधिकार्यांच्या संगनमताने शाळेच्या दुरुस्तीचे काम रद्द करून पुनर्वसनाला देण्याचा घाट घालण्यात आला. परिशिष्ट -२मध्ये शाळेचा आलेख नसल्याने २0१३ला एसआरएची योजनेसाठी प्रय▪सुरू झाले, असा आरोपही दराडे यांनी केला. बैठी व छोट्या मैदानासह असलेली ही शाळा २२५0 स्क्वेअर फूट जागेवर उभी होती. मात्र, बिल्डरला जागा मोकळी करता यावी, यासाठी ही शाळा शेजारच्या एका नवीन एसआरआयच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर जेथे बालवाडी भरते त्या जागेत स्थलांतरित करण्यात आली. छोट्याशा वन रूम किचनमध्ये शाळेचे वर्ग सुरू झाले. सुरुवातीला अडीचशे मुले होती, त्यानंतर ही संख्या ६५वर आली. गळतीचे प्रमाण वाढत गेले व मराठी माध्यमाची आता अवघी १७ मुलेच शिल्लक राहिली आहेत. नियमानुसार पट कमी असल्याने या मुलांना आता इतर शाळेतील वर्गात समायोजन करावे लागणार आहे. एवढा मोठा निर्णय घेताना शिक्षण समितीची मंजुरी घेण्यात आलेली नाही. पूर्वी ज्या ठिकाणी शाळ.ा भरत होती त्याच जागेत भरावी, यासाठी तत्कालीन शिक्षण समिती अध्यक्ष रितू तावडे यांनी पत्रव्यवहारही केला. मात्र, त्याला प्रशासनाने दाद दिली नाही. ही शाळा आता दुसर्या ठिकाणी बांधली जाणार असून बिल्डरचे हित जपण्यासाठी हे सर्व सुरू असून मराठी शाळा बंद पाडण्याचा हा डाव आहे, असा आरोपही दराडे यांनी केला आहे.
शाळांच्या जागा अशा प्रकारे विकासक बळकावणार असेल तर गंभीर आहे. अशा अनेक शाळा असू शकतात की त्याबाबत पालिकेला काहीही माहिती नाही किंवा माहिती असूनही कारवाई करण्यास हात आखडता घेतला जातो, अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची चौकशी व्हावी, अशी भाजपाच्या नगरसेविका रितू तावडे यांनी मागणी केली. तर शाळेच्या जागेवरचा हा गोलमाल नेमका काय आहे, याची माहिती प्रशासनाने येत्या सभेत देऊन संबंधितांवर काय कारवाई केली, याचे स्पष्टीकरण करावे, असे शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सांगून झटपट सभा तहकुबी मांडली.