दादरमधून नव्या नोटांसह ८५ लाख जप्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 December 2016

दादरमधून नव्या नोटांसह ८५ लाख जप्त

मुंबई - क्राईम ब्रँचच्या युनिट पाचने माटुंगा येथील हिंदू कॉलनीतून एका इनोव्हा गाडीतून 85 लाखांची नवीन नोटांची रोकड जप्त केली असता, ती काळबादेवी येथील दोन फर्मची असल्याचे समोर आले आहे. रक्षा बुलियन आणि संघवी बुलियन अशी या दोन फर्मची नावे असून याप्रकरणी सात जणांची कसून चौकशी सुरू आहे. जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या बदल्यात या नवीन नोटा देण्यासाठी ते हिंदू कॉलनीत आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, या नोटा कोणाला देण्यासाठी आले होते याचा तपास सुरू आहे.

माटुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंदू कॉलनीमध्ये एका गाडीतून मोठय़ा प्रमाणात रोकड जाणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या युनिट पाचला मिळाली होती. त्यानुसार, पोलीस पथकाने या ठिकाणी सापळा लावला. या ठिकाणहून निघालेल्या गाडीची पोलिसांनी झडती घेतली असता, काही बॅगांमध्ये मोठय़ा प्रमाणात नवीन 2 हजार रुपयांच्या नोटा असलेली 73 लाख तसेच 100 रुपयांच्या नोटा असलेली 12 लाख अशी एकूण 85 लाखांची रोकड सापडली.

बँकेतून केवळ 24 हजार रुपये रक्कम काढण्याची मर्यादा असताना जुन्या नोटांच्या बदल्यात एवढी मोठी नवीन नोटांमध्ये रक्कम या फर्मला कशी आणि कोठून मिळाली? तसेच ही रक्कम कोणाला देण्यात येणार आहे याची चौकशी सुरू आहे. मात्र, ही नवीन रक्कम एका ज्वेलर्स मालकाला जुन्या रकमेच्या बदल्यात देण्यात येणार होती, अशी माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला जुन्या नोटांच्या बदल्यात ही नवीन रोकड देण्यात येणार होती असेही समजते. त्यामुळे हा माजी मुख्यमंत्र्याचा भाचा कोण याकडे प्राप्तीकर विभागाची करडी नजर राहणार आहे.

Post Bottom Ad