केंद्र शासनाच्या वस्तू व सेवा करामुळे उद्योगांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारी प्रोत्साहन योजना सुरु ठेवणे आणि त्यातील परतावा रकमेचा हिस्स्यासंदर्भात या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी टाटा मोटर्सचे सुशांत नाईक, राजेश शुक्ला, महिंद्रा कंपनीचे भारत मोसद्दी, तुषार गद्रे,मर्सिडीजचे अनंतरामन टी. बलराम प्रधान, फियाट कंपनीचे आकाश मित्तल,वोक्सवॅगनचे पंकज गुप्ता, सियामचे सुगातो सेन, जयेश सुळे आदी उपस्थित होते.
जीएसटीमुळे राज्य शासनाच्या प्रोत्साहन योजनेतून उद्योगांना मिळणारा परतावा कमी होणार आहे. त्यामुळे उद्योगांचे नुकसान होणार असल्याचे या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले. यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हा सगळ्या राज्यांचा प्रश्न आहे. उद्योगांच्या स्पर्धामत्मक वाढीसाठी प्रोत्साहन म्हणून राज्य शासन कर परतावा देत आहे. जीएसटीमुळे या योजनेत सहभागी होणाऱ्या उद्योगांचे नुकसान होऊ नये यासाठी निश्चित प्रयत्न करू. या समस्येतून राज्य शासनाकडून नक्की मार्ग काढण्यात येईल. या संदर्भात राज्य शासन वेगळे मॉडेल तयार करेल. उद्योग मंत्री देसाई यांनी यावेळी प्रोत्साहन योजनेची माहिती दिली.