मुंबई | प्रतिनिधी -
वरळी येथील कोकणदर्शन भवन फुटपाथ, संदानद हॉटेलसमोर भाजप बेेस्ट कामगार संघटनेचे सचिव दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी आठवडे बाजार बुधवारी ता.(१४) भरवण्यात आला होता. या बाजाराचे नगरसेवक प्रकाश दरेकर आणि बेस्ट चेअरमन मोहन मीठबावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
शेतकर्यांचा माल थेट उपलब्ध होण्यासाठी शेतकरी बाजार मुंबईतील प्रत्येक प्रभागात भरवण्याची भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांची संकल्पना आहे. हा बाजार श्री स्वामी समर्थ उत्पादक आणि अंत्योदय प्रतिष्ठान संकल्पित शेतकरी ग्राहक थेट योजनेंतर्गत वरळीत प्रत्येक बुधवारी सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत भरवण्यात येणार आहे.
वरळीकरांना थेट शेतकरी गटांचा उत्पादित माल, भाजीपाला, फळे, धान्य, कड़धान्य, मध, चटणी, मसाले, लोणची पापड, दुग्धजन्य पदार्थ मिळणार आहे. शेतकर्यांचा फायदा आणि ग्राहकांचा फायदा व्हावा म्हणून हा आठवडे बाजार भरला आहे. शेतकर्यांचा माल हा थेट ग्राहकांना मिळावा यासाठी आम्ही हा एक प्रयत्न केला असल्याचे भाजप बेेस्ट कामगार संघटनेचे सचिव दीपक सावंत यांनी सांगितले. यावेळी राजन रेडकर, सुनिल राणे, विजय बांदिवडेकर, विनोद रॉय,जिंतेद्र रॉ आणि आदी मान्यवर उपस्थित होते.