प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रथमच राज्य निवडणूक आयोगाचा चित्ररथ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रथमच राज्य निवडणूक आयोगाचा चित्ररथ

Share This
मुंबई दि.28 Dec 2016 - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार जागृती आणि 73 व 74 व्या राज्यघटना दुरूस्तीला 25 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने येथील शिवाजी पार्कवर 26 जानेवारी 2017 रोजी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच समावेश केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या हस्ते या चित्ररथाच्या प्रतिकृतीचे आज येथे अनावरण करण्यात आले.
आयोगाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मल्लिक,आयोगाचे सचिव शेखर चन्ने, सर ज. जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, अधिव्याख्याता विजय बोंदर आदी उपस्थित होते. 73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाली आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचीही स्थापना करण्यात आली. शिवाय आता बृहन्मुंबईसह 10 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर हा चित्ररथ तयार करण्यात येत आहे.

चित्ररथाचे संकल्पना चित्र सर ज. जी. कला महाविद्यालयाचे असून तेच त्याची निर्मितीही करणार आहेत. चित्ररथाच्या प्रथम दर्शनी भागावर उडत्या श्वेत अश्वाचे शिल्प असेल. ते भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभावरून घेतले आहे. चित्ररथाच्या मध्यभागी महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या प्रातिनिधीक स्वरूपात इमारती दर्शविल्या जातील. चित्ररथावर मतदारांना मतदानासाठी आवाहन करणारा जिवंत देखावाही असेल. चित्ररथाच्या मागील बाजूस मोठा एलईडी पडदा असेल. त्यावर मतदार जागृतीसंदर्भातील घोषवाक्य, पोस्टर्स, चित्रे, ध्वनिचित्रफिती दाखविण्यात येतील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages