मुंबई : नोव्हेंबर महिन्यात अचानकपणे बंदी आणलेल्या ५00 व १000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द ठरवल्यानंतर नव्या ५00 रुपयांच्या एका नोटेसाठी ३.0९ रुपये खर्च येत असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण लिमिटेडने दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडे नवीन नोटांच्या ५00 आणि १000च्या नोटांच्या मुद्रणाचा एकूण खर्च, नोटांच्या संख्या आणि कंत्राटाची रकमेची माहिती माहिती अधिकारांतर्गत अनिल गलगली यांनी मागवली होती. त्यानुसार २00५च्या कलम ६/३ अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण लिमिटेडला हस्तांतरित केला होता. भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक पी. विल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार २0१६/१७ च्या आर्थिक वर्षात कंपनीने नवीन डिझाईनवाल्या ५00च्या एक हजार नोटा ३0९0 रुपयांस विकल्या गेल्या आहेत. ५00 ची एक नोट मुद्रित करण्याचे मूल्य ३.0९ रुपये आहे, तर १000 रुपयांच्या नोटेची माहिती त्यांच्याकडे नसल्याचे सांगण्यात आले. ५00, १000 च्या नोटांचे कंत्राट, एकूण किंमत, दिली गेलेली रक्कम आणि प्रलंबित रकमेची माहिती २00५ चे कलम ८:१/क अंतर्गत नाकारली गेली. या कलमाअंतर्गत देशाच्या सार्वभौमत्वाला किंवा एकात्मतेला, राज्याच्या सुरक्षेला, युद्धतंत्रविषयक, वैज्ञानिक किंवा आर्थिक हितसंबंधांना, परकीय राज्याबरोबरच्या संबंधाला बाधा पोहोचेल किंवा अपराधाला चिथावणी मिळेल, असे नमूद करण्यात आले आहे.