नवी दिल्ली : सौदी अरब सरकारने या वर्षी भारतातून हजयात्रा करणार्यांच्या आरक्षणात २९ वर्षांतील सर्वात मोठी वाढ केल्याची घोषणा गुरुवारी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केली. त्यानुसार, २0१७ मध्ये भारतातून १ लाख ३६ हजार नाही, तर तब्बल १ लाख ७0 हजार लोक हजयात्रा करू शकणार आहेत.
केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि सौदी अरबचे हज व उमराह मंत्री डॉ. मोहम्मद सालेह बिन ताहेर बेनतेन यांनी करारावर स्वाक्षरी केली. हा करार याच वर्षी लागू होणार असून हजला जाणार्या भारतीयांचा कोटा वाढविण्यात येणार आहे. २0१२ मध्ये भारतातून जवळपास १.७0 लाख नागरिकांना हज करण्याची व्यवस्था सौदी अरब सरकारने करून दिली होती. मात्र, त्यानंतर मुख्य मशिदीचा व्याप वाढविण्यासाठी सुरू असलेल्या बांधकामामुळे हाजींच्या सुरक्षिततेकरिता सौदी सरकारने प्रत्येक देशातून हज यात्रेसाठी येणार्यांचा कोटा टक्क्यांनी कमी केला. प्रत्येक वर्षी बांधकाम आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव भारतीय हाजींचा कोटा अवघ्या १.३६ लाख एवढय़ावर येऊन ठेपला होता. सुरक्षिततेच्या वाढीव उपाययोजना आणि बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सौदी अरब आणि भारताने करार करून भारतीय हाजींचा कोटा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बस नकवी यांनी या कराराचे स्वागत केले. तसेच यावर्षीपासून जवळपास ४५ हजार अतिरिक्त भारतीय हजयात्रा करू शकतील असे जाहीर केले. गेल्या २९ वर्षांत भारतीय हाजींना दिल्या जाणारा हा सर्वात मोठा कोटा आहे असा दावा केला जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, केंद्र सरकारने २ जानेवारी रोजीच हज यात्रा करणार्या भारतीयांसाठी एक विशेष अँप जाहीर केले. त्या अँपच्या माध्यमातून हजला जाण्यास इच्छुक असलेल्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत.