मुंबई : मुंबई महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण समिती आणि सुधार समिती सातत्याने भाजपाकडे राहिली आहे. या सुधार समितीच्या माध्यमातून जनतेसाठी राखीव असलेले भूखंड हेरून त्यावरील आरक्षण उठवण्याचे व ते बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम भाजपाने केले आहे. गेल्या २२ वर्षांत या माध्यमातून २ लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
याविषयी बोलताना नवाब मलिक म्हणाले, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हे सुधार समितीचे चॅम्पियन आहेत. नगरसेवक असताना शेलार यांनी सुधार समिती कधीही सोडली नाही. काही दिवसांपूर्वी आशीष शेलार यांच्या वांद्रे मतदारसंघातला एल्को मार्केट समोरचा हिल रोड येथील भूखंड आरक्षण मुक्त करण्यात आला. जवळपास तीन ते चार हजार स्क्वेअर मीटरचा सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित असलेला भूखंड आरक्षणमुक्त करण्यात आला. यासाठी सुधार समितीच्या माध्यमातून ४0 कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला. अशा प्रकारचे अनेक गैरव्यवहार या सुधार समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहेत, ते पुढील पत्रकार परिषदेत जाहीर करू, असे त्यांनी जाहीर केले. स्वत: घोटाळे बहाद्दर आहेत तेच लोक पारदर्शक कारभार करण्याची अट ठेवतात, ही बाब अत्यंत हास्यास्पद असल्याचा टोला त्यांनी लगावला.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष सांगत आहेत की, शिवसेनेशी युती करताना पारदर्शक कारभार ही एक अट असेल. मात्र गेली २२ वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात घोटाळा झाला आहे. महापालिकेतील प्रत्येक समितीत आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे शिवसेनेने घेतलेल्या प्रत्येक निर्णयात व त्यातून झालेल्या गणवेश घोटाळा, टॅब घोटाळा, कचरा घोटाळा, टँकर घोटाळा, नालेसफाई, रस्ते घोटाळा या सगळ्या भ्रष्टाचारात भाजपादेखील वाटेकरी असल्याची टीका नवाब मलिक यांनी या वेळी केली.
भूखंडाचे श्रीखंड खाणार्यांच्या उलट्या बोंबा - अॅड आशिष शेलार मुंबई, दि. 12 जानेवारी 2017 -
ज्या आघाडी सरकारच्या काळात भूखंडाचे श्रीखंड खाल्ले..ज्या काळात बांद्रा चे आमदार, नगरसेवक काँग्रेसचे होते त्याच काळात आरक्षण बदलल्या भूखंडाची माहिती नवाब मलिक आता माहिती उघड करून उलट्या बोंबा मारत आहेत. असे प्रतीउत्तर देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्याकडे माहिती होती तर मग ती लपवणे गुन्हा आहे त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी करण्यात यावी, अशी तात्काळ मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
नवाब यांनी केलेले आरोप आमदार आशिष शेलार यांनीच फेटाळून लावले आहेत. तसेच भाजपाचे सुधार समितीचे अध्यक्षपद ज्यांना मिळाले अशा पराग अळवणी, योगेश सागर, भालचंद्र शिरसाट, आशिष शेलार, मनोज कोटक आणि आताचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांच्या कुणाच्याही काळात तसेच शिक्षण समितीचे अध्यक्षही अनेकजण झाले यांच्या कुणाच्याही काळात एक ही रूपयांचा भ्रष्टाचार झालेला नाही, असेही आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
नवाब मलिक बांद्रा येथील जो भूखंडाचा नकाशा दाखवत आहेत. त्याचे आरक्षण बदलले असेल तर त्याचा काळात राज्यात आघाडीचे सरकार होते व नगर विकास विभाग काँग्रेसचे होता. तर बांद्रा चे स्थानिक आमदार काँग्रेसचे होते नगरसेवक त्यावेळेस आणि आताही काँग्रेसचे आहेत. या आरक्षण बदलाशी भाजपाचा अथवा वैयक्तिक माझा कोणताही संबंध नाही, असेही आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लँड माफिया असा उल्लेख केल्यानंतर मी स्वतः त्यावेळे आघाडी सरकारच्या काळात 33 (1) आणि 33 (2) चा उपयोग करून आरक्षण बदलून भूखंडाचे श्रीखंड कसे आघाडीच्या काळात खाल्ले याची यादीच दिली होती, असे सांगून आमदार आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्यावरच आरोप पलटून लावला आहे. जो बांद्रा येथील भूखंड ते दाखवत आहे, त्याचे आरक्षण नगरविकास विभागानेच बदलले. त्याची चौकशी करा, असा आरोप आमदार शेलार यांनी केला आहे.
सदर प्रकरणी माझे शिफारस पत्र तर सोडा अथवा बैठकीचे इतीवृत्तांत अथवा तस्सम कोणताही पुरावा न देताच नवाब मलिक आरोप करीत असून या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. अशा शब्दांत आमदार शेलार यांनी फटकारले आहे. भाजपा पारदर्शक कारभारासाठी आग्रही असून यापुढेही आम्ही कायम आग्रही राहिल. असेही आमदार शेलार यांनी ठणकावून सांगितले आहे.