मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई महापालिका निवडणूक़ीची 11 जानेवारीपासून आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापौर वगळता पालिकेतील विरोधीपक्ष नेते व विविध समित्यांचे अध्यक्ष यांनी आपली वाहने पालिकेकडे जमा केली आहे. सरकारी, निमसरकारी मालमत्तेचा, वाहनांचा निवडणूक प्रचाराचा गैरवापर होऊ नय़े या उद्देशाने ही वाहने जमा करण्यात आली आहेत. महापौर स्नेहल आंबेकर यांना दादर, शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थान ते महापालिका मुख्यालयापर्यंत कार्यालयीन कामकाजासाठी त्यांच्याकडे असलेले लाल दिव्याचे वाहन वापरण्यास सवलत देण्यात आली आहे.
बुधवारी 11 जानेवारीला निवडणूक आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर उपमहापौर, सभागृह नेत्या, विरोधीपक्ष नेते, स्थायी समिती अध्यक्ष, सुधार समिती अध्यक्ष, बेस्ट समिती अध्यक्ष तसेच महिला व बालकल्याण, आरोग्य समिती, विधी समिती, बाजार व उद्यान, स्थापत्य समिती तसेच 17 प्रभाग समित्यांचे अध्यक्ष या सर्व समिती अध्यक्षांची वाहने आचार संहिता लागू झाल्याने महापालिकेने जमा केली आहेत. त्यामुळे आचारसंहिता काळात महापालिका मुख्यालयात व प्रभागातील होणा-या बैठकांना स्वतःची वाहने वापरावी लागणार आहेत.