नवी दिल्ली : पुढील आर्थिक वर्षापासून सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचार्यांना त्यांच्या वर्षभरातील कामगिरीचे मूल्यमापन करून त्यानुसार बोनस देण्यात येणार आहे. पुढील वर्षी सरकारी बँक कर्मचार्यांना आकर्षक पॅकेज देण्यात येणार आहे. त्यात वाढीव बोनस, राखीव समभाग आणि कार्यक्षमतेवर आधारित लाभांशाचा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा बँक बोर्ड ब्युरोचे अध्यक्ष विनोद राय यांनी गुरुवारी केली.
सरकारी बँकिंग क्षेत्रात अधिकाधिक तरुण व्यावसायिक आकर्षित होऊन बँकांच्या सेवांचा दर्जा वाढावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती राय यांनी दिली. ते अँसोचॅम उद्योग संघटनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. सध्या सरकारी बँक कर्मचार्यांना मिळणार्या स्थिर वेतनात बदल होतील किंवा नाही याविषयी भाष्य करण्याचे मात्र राय यांनी जाणीवपूर्वक टाळले. पण वेतनाव्यतिरिक्त देण्यात येणारे पॅकेज आकर्षक करण्याचा प्रयत्न असेल, असे मात्र त्यांनी स्पष्ट केले. यामुळे सरकारी बँक कर्मचार्यांच्या वेतनात मोठा फरक पडण्याची शक्यता आहे. सरकारी बँकांमध्ये केंद्र सरकारचा हिस्सा किती असावा, याविषयी देखील बँक ब्युरो सध्या विचार करीत असल्याचे राय यांनी सांगितले. सध्या सर्व सरकारी बँकांना थकित कर्जाची (एनपीए) समस्या भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर राय म्हणाले की, बँकांचा कारभार संचालकांनी चालवल्यास यापुढे बँकेसंबंधीच्या सर्व निर्णयास तेच जबाबदार असतील. यामुळे वेळ पडल्यास कठोर निर्णय घेणे त्यांना शक्य होईल. सरकारी बँकांच्या प्रमुख पदांवर योग्य आणि कर्तृत्ववान व्यक्तींची नेमणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे असेदेखील राय यांनी या वेळी सांगितले.