नोटाबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली - सुनिल तटकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 January 2017

नोटाबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली - सुनिल तटकरे


मुंबई  9 जानेवारी 2017 - नोटबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने जी पावले उचलायला हवी होती, ती न उचलल्याने या निर्णयानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत देशातील शेतकरी भरडला गेला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक सुनिल तटकरे यांनी केले आहे. तर नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस लाखोंच्या संख्येने वाढ होत असल्याच्या वस्तुस्थितीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी लक्ष वेधले. आजपासून राज्यभर नोटाबंदीच्या निर्णया विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. मुंबईतही राष्ट्रवादीच्या वतीने सोमवारी वांद्रे परिसरातील खेरवाडी जंक्शन येथून भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

या जनआक्रोश मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मुंबई अध्यक्ष सचिन अहीर, विद्या चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधानांच्या विरोधात घोषणाबाजी करत नोटाबंदीच्या त्यांच्या निर्णयाबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. खेरवाडी सिग्नल येथुन निघालेला हा जनआक्रोश मोर्चा वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोहोचल्यानंतर तेथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना मा. तटकरे म्हणाले की, नोटबंदीनंतर केंद्र सरकारने जी पावले उचलायला हवी होती, ती उचलली गेली नाहीत . या आत्मघातकी निर्णयामुळे प्रामुख्याने देशातील शेतकरी भरडला गेला. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नसल्याने , ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना मुंबई अध्यक्ष मा. सचिन अहिर यांनीही नोटाबंदीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर जोरदार टीका केली. पंतप्रधानांनी कोणताही विचार न करता हा निर्णय घेतल्याचे सांगत मा. अहिर म्हणाले की, या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेने जवळपास ६२ पेक्षा जास्त सुधारणा मुळ निर्णयात केल्या. हीच बाब सरकार आणि रिझर्व्ह बँकेत समन्वय नसल्याचे चित्र स्पष्ट करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणावर काळा पैसा बाहेर पडेल असा दावा केला होता. प्रत्यक्षात मात्र माता भगिनींकडे असलेली घरगुती स्वरुपाची बचत नाईलाजास्तव बाहेर काढावी लागली. पैसे असुनही ते काढता येत नसल्याने निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीमुळे घरातल्या छोट्यांच्या पिगी बँक तोडाव्या लागल्या. या पैशाला तुम्ही काळा पैसा मानता का, असा सवाल मा. अहिर यांनी विचारला. शिवाय एवढे सगळे त्रास सहन करुन सर्वसामान्य नागरिकांना काय मिळाले. काळा पैसा बाळगणाऱया किती जणांना शिक्षा झाली, असा सवाल करत मा. अहिर म्हणाले की, नोटाबंदीची मुदत संपल्यानंतर चलनात असलेल्या १५ लाख ४४ हजार कोटी रुपयांपैकी १४ लाख ९७ हजार कोटींची रक्कम पुन्हा बँकांमध्ये आल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे काळ्या पैशाबाबतचे भाजपचे सर्व दावे फोल ठरले आहेत. चलनात असलेला काळा पैसा बदलून घेताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. आणि या गैरव्यवहारात भाजपच्याच अनेक पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याकडेही मा. अहिर यांनी लक्ष वेधले. तर लोकसभेच्या आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या काळात सरकारच्या फोल ठरलेल्या निर्णयावर सरकारला धारेवर धरणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad