मुंबई 9 जानेवारी 2017 - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नोटांबदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला होत असलेल्या प्रचंड त्रासाविरोधात आवाज उठवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, अहमदनगर, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आदीसह संपुर्ण राज्यात जिल्हा व तालुका पातळीवर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पक्षाचे वरिष्ठ नेते, आजी/माजी आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पुणे येथे राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ६१ दिवस उलटून गेले आहेत, हा निर्णय जाहीर करताना महागाई कमी करू, काळा पैसा बाहेर काढू, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? असा खडा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. या आंदोलनात खा. वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे आणि इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.
मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे तसेच मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात बांद्रा खेरवाडी येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्य प्रवक्ता नवाब मलिक , आ.विद्याताई चव्हाण, प्रदेश सरचिटणीस दिनकर तावडे उपस्थित होते. नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी फसल्यामुळे देशातील सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, मजूर, छोटे-मध्यम उद्योजक यांचे प्रचंड हाल होत असून याला सरकारचा नियोजन शुन्य कारभार जबाबदार असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला.
> भोर तालुक्यातील कापूरहोळ येथे राष्ट्रवादीच्या खासदार ,सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
> सांगली येथे आ.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो नागरिक व पक्षाचे कार्यकर्ते उस्फुर्तपणे सहभागी झाले होते.
> कोल्हापूर येथे खा.धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुणे - बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले.
>
> नोटबंदी कसली ही तर आर्थिक नसबंदी, अशा घोषणा देत कोरेगाव (जि.सातारा) येथे माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
>
> अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
>
> औरंगाबादमधील वैजापूर येथे आ. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली नोटाबंदी विरोधातील जनआक्रोश आंदालनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
>
> खेड येथील जनतेने देखील रास्ता रोको करत आंदोलन केले. बदलापूर शहारातर्फे अंबरनाथचे तहसीलदार यांना बेबंद सरकार विरोधात निवेदन देत आंदोलन करण्यात आले.
>
> महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व तालुका पातळीवर हे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले, व या आंदोलनाच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.