अन्यायाविरोधात मच्छिमार समाज महापालिका निवडणूक रिंगणात उतरणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अन्यायाविरोधात मच्छिमार समाज महापालिका निवडणूक रिंगणात उतरणार

Share This
मुंबई  (प्रतिनिधी) - मुंबईमध्ये होणाऱ्या कोस्टल रोड, शिवस्मारक आणि मेट्रो- 3 प्रकल्पामुळे मच्छिमार समाजाच्या पारंपारिक व्यवसायवर गदा येणार आहे. समाजावरील या अन्यायाविरोधात मच्छिमार समाजाने मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आपला उमेदवार उतरण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे.


पालिका निवडणुका जाहीर झाल्यामुळे सध्या राजकीय ‘दंगल’ सुरू झाली आहे. कुलाबा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी मच्छिमार समाजावर  वारंवार अन्याय केला जातो. गेल्या कित्येक वर्षापासून कोळी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याने मच्छिमार समाजाच्या रोजी रोटीवर गदा येणार आहे. तर कोस्टल रोड आणि मेट्रो- प्रकल्पामुळे कोळीवाडे उध्दवस्त होण्याची भीती आहे. राज्य सरकारला याप्रस्तावाबाबत वारंवार विनवण्या केल्या तरीही सरकारने याकडे दुर्लक्ष करत शिवस्मारकाची जागा निश्चित केली. तर कोस्टल रोड आणि मेट्रो-3 प्रकल्प येऊ घातला आहे. प्रकल्पाला सरकारने हिरवा कंदील देत मासेमारी हे एकमेव उपजिविकेचे साधन असलेल्या कोळी समाजावर भाजपने घोर अन्याय केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ घोषणाबाजी करण्यात तरबेज आहेत. सायन येथे झालेल्या कोळी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी महादेव कोळी दाखला देण्याची घोषणा केली होती. परंतु, दीडवर्षानंतरही ती सत्यात उतरलेली नाही.  मुंबईला सिंगापुर करण्याकडे भाजपचा कल आहे. त्यासाठी कोळी समाजावर अन्याय केला जातो आहे. परंतु, आता मच्छिमार आणि कोळी समाज जागा झाला असून राजकीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी समजाने पालिका निवडणुकीच्या रिंगणात आपला उमेदवार उतरवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. उमेदवारांची चाचपणी देखील सुरू झाली असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages