मुंबई - 14 व्या मुंबई मॅरेथॉनला रविवारी (15 जानेवारीला) राज्यपाल विद्यासागर राव यांनी हिरवा झेंडा दाखवत सुरुवात झाली. मॅरेथॉनमध्ये 42,379 स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. मॅरेथॉनमधील 42 किलोमीटरची पुरुष गटाची मुख्य मॅरेथॉन टांझानियाच्या अल्फोन्स सिंबूने जिंकली. महिला गटात मुख्य मॅरेथॉनमध्ये चाल्तु ताफा दुसऱ्या क्रमांकावर तर इथिओपियाच्या टिजिस्ट गिर्माने तिसरा क्रमांक पटकावला.
भारतीय गटात खेता राम यांनी अव्वल क्रमांक पटकाविला. मुख्य मॅरेथॉन पार करणारी ज्योती गवते पहिली महिला धावपटू ठरली आहे. हाफ मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक जी.लक्ष्मणने, दुसरा क्रमांक सचिन पाटील आणि तिसरा क्रमांक दीपक कुंभारने पटकावला. तर महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक मोनिका अत्रे, दुसरा क्रमांक मिनाक्षी पाटील आणि तिसरा क्रमांक अनुराधा सिंगने पटकावला.
महिलांमध्ये कितूरने २:२९:०२ अशी वेळ नोंदवत सहज सुवर्ण पदक पटकावले. कितूरच्या वेगापुढे निभाव न लागलेल्या चाल्तू ताफा (२:३३:०३) आणि तिगिस्ट गिरमा (२:३३:१९) या इथिओपियाच्या धावपटूंना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुषांची स्पर्धा अत्यंत अटीतटीची झाली. विजेत्या खेतारामने २ तास १९ मिनिटे ५१ सेकंदाची वेळ देत शर्यत पूर्ण केली, तर बहादूरसिंग धोनीने २ तास १९ मिनिटे ५७ सेकंदाची वेळ दिली. संजित लुवांगने २ तास २१ मिनिटे १९ सेकंदाच्या वेळेसह कांस्य पटकावले. जवळजवळ ३० किमी अंतरापर्यंत तिन्ही विजेते धावपटू एकत्रित होते. मात्र, नंतर खेतारामने वेग वाढवत काहीशी आघाडी मिळवली. अखेरच्या ३ किमीमध्ये धोनीने वेग वाढवताना खेतारामला गाठण्याचा प्रयत्न केला, परंतु अनुभवाच्या जोरावर खेतारामने आपली आघाडी कायम राखत बाजी मारली.
महिलांमध्ये महाराष्ट्राची अनुभवी धावपटू ज्योती गवातेने अपेक्षित वर्चस्व राखले. तिने २ तास ५० मिनिटे ५३ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवताना सहज बाजी मारली. विशेष म्हणजे, द्वितीय स्थानी राहिलेल्या बंगालच्या श्यामली सिंगला तिने तब्बल १५-१६ मिनिटांनी पिछाडीवर टाकले. श्यामलीने ३ तास ८ मिनिटे ४१ सेकंदाची वेळ दिली, तर पहिल्यांदाच मुख्य मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या जिगमेट डोल्माने लक्षवेधी कामगिरी करताना ३ तास १४ मिनिटे ३८ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना कांस्य पदक पटकावले.
१४ व्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचे विजेते
परदेशी पुरुष गट विजेते
१ अल्फॉन्स सिंबू, टांझानिया
२ होशुआ किपकोरिर, केनिया
३ इल्यू बर्गेटनी
परदेशी महिला गट विजेते
१ बोर्नेस कितूर, केनिया
२ तिगी गिरमा, इथिओपिया
हाफ मॅरेथॉन पुरुष गट विजेते
प्रथम – जी लक्ष्मण
द्वितीय – सचिन पाटील
तृतीय – दीपक कुंभार
हाफ मॅरेथॉन महिला गट विजेते
प्रथम – मोनिका अत्रे
द्वितीय – मीनाक्षी पाटील ( महाराष्ट्र पोलीस )
तृतीय – आराधना सिंग ( सीआयएसएफ )
फुल मॅरेथॉन भारतीय पुरुष गट विजेते
प्रथम – खेता राम
द्वितीय – बहादूर सिंग धोनी
तृतीय – टी.एच. संजीत लुवांग
फुल मॅरेथॉन भारतीय महिला गट विजेते
प्रथम – ज्योती गवते, परभणी

स्पर्धकांचा उत्साह आणखी वाढावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल, शिक्षण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, अमृता फडणवीस, अभिनेता जॉन अब्राहम, आशीष शेलार, माजी खासदार प्रिया दत्त आणि टीना अंबानी, महादेव जानकर, शायना एनसी, यांच्यासह तारक मेहताचा उल्टा चष्माची टीम देखील उपस्थित होते. हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना दमछाक झाल्याने एक तरुण जमिनीवर कोसळला. त्या तरुणावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

