मुंबई - देशात नोटाबंदीमुळे आर्थिक स्थिती खालावली असून रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आर्थिक मंदीत ढकलले असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भारिप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकरांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीची घोषणा करताना म्हणाले होते की, या निर्णयाबाबतीत पूर्ण गुप्तता पाळली होती. मंत्र्यांनाही त्याची माहिती नव्हती. रिझर्व्ह बँकेने १६ सप्टेंबर आणि ११ नोव्हेंबर २०१६ या काळातील जमा झालेल्या बँक डिपॅाझिटची जी माहिती जाहीर केली आहे, ती माहिती पंतप्रधानांचा दावा कसा खोटा आहे ? हे स्पष्ट करणारी आहे.
या ५६ दिवसांत बँकांमध्ये जमा झालेल्या रक्कमेचा आकडा ३ लक्ष २३ हजार ८२३ कोटी रुपये इतका होता. हा आकडा नेमका इतकाच आहे की, जितका पैसा लोकांनी स्वत:कडे साठवून ठेवल्याचा अंदाज पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला होता. काळा पैसा तर नोटाबंदीनंतर बाहेर आलाच नाही, तर मग मोदींचा नेमका हेतू काय होता ? असा सवाल करून आंबेडकर म्हणाले की, नोटाबंदीचे आणखी भयानक परिणाम सामान्य माणसाला भोगावे लागणार आहेत.
कारण मोठ्या प्रमाणात मंदी येणार आहे. कारण लोक आज अगदी गरजे इतकाच पैसा खर्च करत आहेत आणि उरलेला पैसा घरातच साठवत आहेत. पंतप्रधान मोदी यांचा कारभार हिटलरच्या धर्तीवरच चालू आहे. कारण त्यानेही आधी राजकीय अस्थिरता केली नंतर आर्थिक अस्थिरता आणली आणि मग सर्व आर्थिक व्यवहारावर नियंत्रण आणले मग स्वत:ला हुकुमशहा जाहीर केले. अशी मीमांसा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी कारणे सांगितली ती बनावट होती. कारण ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांनी तो ८ नोव्हेंबरच्या आधीच्या ५६ दिवसात बँकांमध्ये भरला होता. असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.