घाटकोपरमधून २ कोटींचे अमलीपदार्थ जप्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घाटकोपरमधून २ कोटींचे अमलीपदार्थ जप्त

Share This
मुंबई : घाटकोपरच्या छेडानगर येथून अमलीपदार्थाचा पुरवठा करणाऱ्या प्रवीण वाघेला (३४) ला अमलीपदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने सोमवारी रात्री बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून २ कोटी किमतीचे १० किलो एमडी जप्त करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे. 

वाघेलाच्या चौकशीत एमडी तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पथकाकडून वर्तविण्यात येत आहे. त्या दिशेने अधिक तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली; मात्र गेल्या काही दिवसांतमध्ये एमडीने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात एमडी तस्करीच्या कारवाया वाढत आहेत.

घाटकोपरच्या अमलीपदार्थविरोधी पथकाला चेंबूर परिसरात कारमधून एक जण ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी रात्री सापळा रचला. घाटकोपर येथील छेडानगर जंक्शन येथून होंडा सिव्हिक मोटार कारला थांबवूनदेखील ती पुढे जात होती. पथकाला संशय आला. त्यांनी तत्काळ कारचा पाठलाग करून चालकाला ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्या झडतीत २ कोटी ४ लाख किमतीचा १० किलो एमडी हस्तगत करण्यात आला आहे.

वाघेला हा वांद्रे येथील खेरवाडी परिसरात राहणारा आहे. तो चेंबूरमध्ये एमडीचा पुरवठा करण्यासाठी जात असल्याची माहिती तपासात समोर आली. मात्र त्याने हे एमडी कोणाकडून विकत घेतले? तो त्याची किती रुपयांमध्ये विक्री करणार होता? यामागे आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती अमलीपदार्थविरोधी पथकाने दिली. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत आहे. मंगळवारी वाघेलाला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages