संभाजी ब्रिगेड मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 January 2017

संभाजी ब्रिगेड मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार

मुंबई - संभाजी ब्रिगेडनं राजकीय क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेड मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोजदादा आखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत आखरे बोलत होते. 'आज राजकीय सत्ता घराणेशाही, भांडवलदार आणि ब्राह्मणी शक्तींच्या ताब्यात आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद, पंचायत, 18 महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढवणार अाहोत. 170 जागांसाठी अर्ज आलेही आहेत. अमरावती, अहमदनगर, नाशिक, धुळे हे पदवीधर मतदारसंघ आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातूनही संभाजी ब्रिगेड निवडणूक लढवेल. 60 ते 70 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात येईल,' असंही आखरे यांनी स्पष्ट केलं.

काही कार्यकर्त्यानी राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला. त्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्याना अटक झाली. पण आम्ही 1 जानेवारी 2007 रोजी पुणे महापालिका आयुक्तांशी पुतळा हटवण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. शिवसेनेच्या दादर येथे शिवसेना भवन आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. तो काढून पुतळ्याच्या खाली लावावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीनं आंदोलन करेल असा इशारा आखरे यांनी दिला आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांशी पत्रव्यवहार केलेला आहे, असंही आखरे यांनी सांगितलं.

Post Bottom Ad