नवी दिल्ली : रोकडरहित म्हणजेच कॅशलेस व्यवहारांना चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी भारत इंटरफेस फॉर मनी अर्थात 'भीम' अँपला देशातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, केवळ दहा दिवसांतच हे अँप तब्बल एक कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर समाधान व्यक्त केले आहे.
भीम अँपला देशातील नागरिकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'ट्विटर'वरून समाधान व्यक्त केले आहे. 'भीम अँप दहा दिवसांत एक कोटी वेळा डाऊनलोड केल्याचे ऐकून आनंद वाटला,' असे ट्विट मोदींनी केले. 'भ्रष्टाचार व काळय़ा पैशांचा धोका संपविण्यासाठी तंत्रज्ञानाचा परिणामकारकपणे कसा वापर केला जाऊ शकतो, तसेच मेक इन इंडियाचे हे उत्तम उदाहरण आहे,' असेही आणखी एक ट्विट त्यांनी केले.
भीम अँपला मिळालेला प्रतिसाद बघून यावरील व्यवहारांची र्मयादा एका दिवसासाठी दहा हजारांवरून वीस हजारांपर्यंत वाढविण्यावर 'एनपीसीआय'कडून विचार केला जात असल्याचेही यासोबत टाकलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे. कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारने भीम अँपची सुरुवात केली होती. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून या अँपला 'भीम' असे नाव देण्यात आले आहे. भीम अँपच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी कसलेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, बँकांकडून यासाठी काही रक्कम आकारली जाऊ शकते. बँक खाते आणि आधार कार्ड असणारी व्यक्ती या अँपचा वापर करू शकतात. पैशांच्या देवाण-घेवाणीसोबतच बँकेतील शिल्लक रक्कम तसेच व्यवहारांची माहितीही या अँपद्वारे मिळू शकते. येत्या प्रजासत्ताक दिन समारंभादरम्यानही या अँपचे सादरीकरण केले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.