मुंबई - ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारीत मुंबईच्या महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बालचित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चित्रकलेतून मुंबईच्या विविध पैलूंचा उलगडा तर होतोच त्यासोबतच मुंबईच्या विकासाला नवी चालना मिळते, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले. या स्पर्धेत संपूर्ण मुंबईतून ५८ हजार १४६ बालचित्रकारांनी सहभाग घेतला.
जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे मुंबई महानगरातील सर्व महापालिका शाळांतील तसेच खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारीत आणि महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा २०१६-२०१७ चे उद्घाटन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते महापौर निवासस्थानी आज (दिनांक ०८ जानेवारी २०१७) करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर, बाजार व उद्याने समितीच्या अध्यक्षा यामिनी जाधव, शिक्षणाधिकारी महेश पालकर, प्राचार्य (कला) दीनकर पवार या प्रसंगी उपस्थित होते.
स्नेहल आंबेकर पुढे म्हणाल्या की,‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. व्यंगचित्रकार म्हणून त्यांची जगभरात ख्याती आहे. व्यंगचित्रातून अचूक भाष्य करण्याची त्यांची हातोटी वाखाणली गेली. त्यांच्या कलेपासून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी, तसेच मुंबईविषयीच्या जाणिवा विद्यार्थ्यांमध्ये वाढाव्यात, हा ‘माझी मुंबई’ बाल चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश आहे. स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे परीक्षण करुन भविष्यातील मुंबईचे कसे नियोजन करता येईल, भावी पिढीच्या आपल्या शहराविषयी काय कल्पना आणि अपेक्षा आहेत, हे ओळखण्यासाठी ही स्पर्धा दिशादर्शक माध्यम ठरते आहे.
आंबेकर म्हणाल्या की, या स्पर्धेतील स्पर्धकांनी साकारलेली चित्रे ही उच्च दर्जाची व दिशा देणारी असतात. बालचित्रकारांना त्यांच्या मनातील चित्रे दिलेल्या विषयांनुसार रेखाटण्यास वाव मिळत असल्याने ही चित्रे महापालिकेसाठी अमूल्य असतात. स्पर्धेतील विजेत्यांची चित्रे बृहन्मुंबईतील योग्य व मुख्य अशा ठिकाणी होर्डिंग्जच्या स्वरुपात झळकावण्यात येतील, जेणेकरुन सर्व मुंबईकरांपर्यंत ती पोहोचावीत. महापालिकेच्या संकेतस्थळावरदेखील ही चित्रे उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी माहितीही महापौरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. पुढे त्या म्हणाल्या की, बालचित्रकारांनी रेखाटलेल्या छायाचित्रात मुंबईच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच विविध स्थळांची हुबेहूब छायाचित्रे दर्शवली आहेत. त्यासोबत मुंबईतील खाद्य पदार्थ याच्यावर ही आपल्या हस्तकलेतून दिलेल्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. या सर्व छायाचित्रातून मुंबईला एक नवा संदेश निश्चितच मिळतो. तसेच त्यांच्या छायाचित्रातून मुंबई विषयक नव्या कल्पनांचा आविष्कारही पाहायला मिळतो. महापालिका प्रशासनाने याची योग्य ती नोंद घ्यावी, असे निर्देश महापौरांनी दिले.