मुंबई / प्रतिनिधी / 19 Jan 2017 -
ऍट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, बहुजन समाजाचा एकाच मोर्चा निघावा, रिपब्लिकन पक्षातील गटातटांनी ऐक्य करावे या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात संविधान गौरव बहुजन महामोर्चा या संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले. संविधान गौरव बहुजन महामोर्चाच्या वतीने मुंबईमध्ये काढण्यात येणारा २४ डिसेंबरचा मोर्चा रद्द करून समाज एकत्र राहावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून उपोषण करण्यात येत असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
ऍट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी म्हणून बहुजन समाजाचे महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून एकच मोर्चा काढण्यात आले, मात्र मुंबईत तीन वेगवेगळे मोर्चे काढले जात आहेत. तीन वेगवेगळ्या मोर्चांची गरजच काय असा प्रश्न उपस्थित करत मुंबईतून बहुजन समाजाचा एकच मोर्चा निघावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. याच बरोबर बौद्ध, दलित, आदिवासी, मुस्लिम व अल्पसंख्यांक समाजावरील अत्याचारांना पायबंद घालावा, दलित अत्याचार व कोपर्डी प्रकरणातील आरोपीना कठोर शिक्षा करावी, मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, ओबीसी समाजाचे घटनात्मक आरक्षण अभाधीत ठेवावे, भटक्या व सामाजिक पुनर्वसन करावे, मराठा समाजाला संविधानातील तरतुदीनुसार आरक्षण द्यावे, रिपब्लिकन पक्षांनी आपले गट तट बंद करून ऐक्य करावे इत्यादी मागण्यासांठी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी अशोक कांबळे, संदेश कांबळे, सिद्धार्थ लोमटे, वैभव माने, आकाश कांबळे, प्रकाश वानखेडे, अरुण खरात, प्रीतम नाईक, हर्षल गवळे, रवीन्द्र रोकडे, अमोल बोधीराज, संतोष गवळी - पत्रकार उपोषणात सहभागी झाले होते.