पालिका निवडणुक तिकीट वाटपावरून राष्ट्रवादीतील फूट चव्हाट्यावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 January 2017

पालिका निवडणुक तिकीट वाटपावरून राष्ट्रवादीतील फूट चव्हाट्यावर

मुंबई ( प्रतिनिधी ) –पालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच सर्व पक्षाच्या कार्याकर्त्यामध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा देऊन सर्वात आधी पहिली उमेदवारी यादी जाहीर करणा-या राष्ट्रवादीमध्ये आता तिकीट वाटपामधील वाद चव्हाट्यावर आला आहे. दिंडोशी विधानसभा मतदार संघातील सात प्रभागामध्ये तिकीट वाटपावरून उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष अजित रावराणे व आमदार विद्या चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी नरीमन पॉईंट येथील पक्ष कार्यालयासमोरच गोंधळ घातला. गोवंडी येथे संजय दिना पाटील व नवाब मलिक यांच्यातील वाद गाजल्यानंतर पक्षातीलच हा दुसरा वाद समोर आला आहे.

पक्षाने पहिली उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर दुसरी यादीची तयारी सुरू होती. या यादीमध्ये दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील सात प्रभागांचा विचार केला जाणार होता. जिल्हाध्यक्ष अजित रावराणे यांनी यादीत आपल्या समर्थकांची वर्णी लावणार याची माहिती मिळताच आमदार विद्या चव्हाण यांचे समर्थक संतापले. गुरुवारी नरीमन पॉईंट येथील पक्ष कार्यालयासमोर विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अजित रावराणे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. रावराणे यांच्या माध्यमातून तिकीट वाटप करू नका, रावराने यांनी शिवसेनेशी संगनमत केल्याने महापालिका निवडणुकीत पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांना तिकीट देण्यात यावे अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली. पक्षाच्या राष्ट्रवादी भवन या कार्यालयासमोरच हा गोंधळ झाल्याने दुसरी यादी जाहीर होण्यापूर्वीच पक्षातील फूट समोर आली आहे. गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक होणार होती. याआधीच राष्ट्रवादी भवनवर कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत नवा वाद उभा केल्याने पक्षातील फूट उफाळून आल्याचे चित्र होते.

दिंडोशी मतदार संघातील प्रभागात राष्ट्रवादीशी एकजुट असलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्याची मागणी आम्ही करत आहोत...7 तिकीटांपैकी 4 तिकीट आम्हाला मिळावीत अशी आम्ही मागणी केली आहे.
आमदार विद्या चव्हाण..

राष्ट्रवादी भवन मधील हे आंदोलन म्हणजे राष्ट्रवादीची ताकद आहे. पक्ष वाढत आहे, तिकीट मिळविण्यासाठी कार्यकर्ते प्रयास करत आहेत, हे या मोर्चा वरुन स्पष्ट होते.
नवाब मलिक, राष्ट्रवादीचे नेते

Post Bottom Ad