मुंबई - मतदान हा नागरिकांच्या अधिकार असून मतदान करणे हे नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. तरीही मतदानाची टक्केवारी कमी असल्याने आणि अनेक लोक मतदानापासून लांब राहत आहेत. यामुळे मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी लोकांना मतदानासाठी प्रोत्साहत करण्यासाठी ‘सैराट’मधून याड लावणारी आर्ची म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरु व परशा म्हणजे आकाश ठोसर यांना राज्य निवडणूक आयोगाने ब्रँड अॅम्बेसेडर बनविले आहे.
२५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राची लोकप्रिय जोडी रिंकू व आकाशला ब्रँड अॅम्बेसेडर बनविले आहे. त्यामुळे आर्ची व परशा निवडणूक आयोगाच्या पार्टलवर नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दोघांचे फोटो दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगाने हा नवा मार्ग शोधून काढला आहे. सैराटमधले आर्ची आणि परशा पुन्हा एकदा पोस्टर व बॅनर्सवरती झळकणार आहेत. मात्र यावेळी निमित्त चित्रपटाचे नसून निवडणुकीचे असणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये लोकांना मतदान करण्याचे आवाहन आर्ची-परशा करणार आहेत.
महाराष्ट्रातील तरुणवर्ग मतदार नोंदणी आणि मतदान प्रक्रियेत मागे पडत आहे. तीन टक्के तरुणाईपैकी फक्त १.१ टक्के मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होतात. हा टक्का वाढवण्यासाठी आणि भावी मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने ही शक्कल लढवली आहे. आर्ची व परशाला ब्रँड अॅम्बेसेडर केल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यात ८.३४ कोटी मतदार असून त्यापैकी १२.१६ लाख नोंदणीकृत तरुण मतदार आहेत. गेल्या काही वर्षांत मतदार नोंदणीत वाढ झाली असली, तरी ही संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.