मुंबई - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या ९२ युवा कार्यकर्त्यांची यादी भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष मोहित कंबोज यांनी मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांना बुधवारी सुपूर्द केली आहे. भाजपकडून महापालिका उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये डॅाक्टर्स, वकील तसेच सीए यासारख्या सुशिक्षित नागरिकांचा समावेश असून यापैकी अधिकाधिक युवकांना उमेदवारी द्यावी, अशी विनंतीही कंबोज यांनी मुंबई अध्यक्षांना केली. अधिकाधिक युवकांनी राजकारणात सक्रिय व्हावे या उद्देशाने भाजयुमोने सोशल मीडियाच्या माध्यमातून " युथ फॅार एमसीजीएम" नावाची एक मोहिम सुरु केल्याची माहिती कंबोज यांनी दिली.
मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून या निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांच्या साथीने मुंबई भाजयुमोचे युवा कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहेत. महापालिका प्रशासन स्तरावर युवकांना अधिक प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे अशी भुमिका मोहित कंबोज यांनी पक्षश्रेष्ठींसमोर मांडली आहे. त्याला पक्षश्रेष्ठी स्तरावरुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कंबोज यांनी दिली. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून मुंबई भाजयुमोतर्फे कंबोज यांनी तब्बल ९२ युवा इच्छुक उमेदवारांची यादी मुंबई भाजपा अध्यक्ष मा. शेलार यांच्याकडे सुपूर्द केली. समाजाच्या सर्वच स्तरातील सुशिक्षित उमेदवारांचा या यादीत समावेश असल्याचे सांगताना कंबोज म्हणाले की, इच्छुकांमध्ये डॅाक्टर, वकील, सीए आणि पदवीधरांची संख्या लक्षणिय असून महिला, अल्पसंख्याक, इतर मागासवर्ग तसेच अनुसूचित जाती आणि जमातीमधील इच्छुकांचाही यामध्ये समावेश आहे.
ते पुढे म्हणाले की, महापालिका ही राजकारणातील पहिली पायरी असल्याने या टप्प्यावर अधिक युवकांना प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. आम्ही मुंबई अध्यक्षांना तशी विनंती केलीच असून आपले युवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आम्ही आवाहन करतो की त्यांनी आमच्या मागणीचा विचार करुन अधिकाधिक युवकांना संधी द्यावी. कारण हेच युवक उद्याचे आशास्थान असून समाजाला पुढे नेण्यात त्यांचा महत्वाचे योगदान असणार आहे, असेही कंबोज म्हणाले.
"युथ फॅार एमसीजीएम" युवकांचे एक हक्काचे व्यासपीठ
अधिकाधिक युवकांनी राजकारणात सक्रिय व्हावे या उद्देशाने भाजयुमोने सोशल मीडियाच्या माध्यमातून " युथ फॅार एमसीजीएम" नावाची एक मोहिम सुरु केल्याची माहिती कंबोज यांनी दिली. या मोहिमेला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून महापालिका निवडणुकीत या मोहिमेचा' युवकांचे एक हक्काचे व्यासपीठ' म्हणून चंगलाच उपयोग होईल, असा विश्वासत त्यांनी व्यक्त केला.