मुंबई : मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. महापालिकेच्या मागील तीन निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ४० ते ५० टक्के इतकी कमी होती, मुंबईकर मतदार त्यामुळे या निवडणुकीत मतदारांची टक्केवारी १0 टक्के वाढावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. त्यासाठी महापालिकेने जाहिरातबाजीवर सुमारे २२ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सादर करण्यात आला असून त्या खर्चाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर व्हिडीओ शुटिंगसाठी भाडेतत्त्वावर यंत्रणा घेण्यासाठी सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
मागील तीन महापालिका निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या दरम्यान मतदार सुट्टीचा फायदा घेऊन मुंबईबाहेर गेल्याने मतदानाची टक्केवारी ४० ते ५० टक्के होती. अनेक मतदार हे राजकीय पक्षाच्या राजकारणाला कंटाळले असल्याने मतदान करण्यास घराबाहेर पडत नाहीत. अश्या परिस्थितीत महापालिका निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पालिकने कसोशीने प्रयत्न करावेत, नावीन्यपूर्ण कल्पक उपाययोजना राबवाव्यात तसेच विविध जनसंपर्क माध्यमांचा वापर करून मतदारांमध्ये मतदार नोंदणी व प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी जनजागृती अभियान राबवण्याबाबत निवडणूक आयोगाने सुचित केले. यासाठी महापालिकेने बीईएसटी बसस्टॉप आणि रेल्वे स्टेशन आणि स्कायवॉक या ठिकाणी महापालिकेकडून जाहिरातबाजी करण्यात आली आहे. या जाहिरातबाजीसाठी सुमारे २३ लाख ५६ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.
तसेच निवडणुकीसाठी शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरात ३१ निवडणूक अधिकारी कार्यालये असणार आहेत. या कार्यालयांसाठी ३0 दिवसांकरता अंदाजे १३0२0 व्हिडीओ कॅमेरे, रंगीत टीव्ही, डीव्हीडी प्लेअर प्रत्येकी ९६0, प्रोजेक्टर व लॅपटॉप प्रत्येकी ९0, तसेच मतदान यंत्राच्या स्ट्राँग रूमसाठी वेब बेस सीसीटीव्ही यंत्रणा ४६५ आणि मतमोजणीच्या वेळी ३१ यंत्रणा लागणार आहेत. त्यामुळे ही यंत्रणा भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे त्यासाठी सुमारे ६ कोटी ३७ लाख ४६ हजार १२६ रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येणार आहे.

