पंतनगर जंक्शन, पूर्व द्रुतगती मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटविली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पंतनगर जंक्शन, पूर्व द्रुतगती मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटविली

Share This
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एन' विभागांतर्गत येणाऱया अंधेरी-घाटकोपर व पूर्व द्रुतगती महामार्ग यांच्या नाक्यावर तयार होणाऱया 'पंतनगर जंक्शन'येथील सुमारे २ एकर जागेवरील नर्सरी, वाहनतळ, खडी-रेतीवाले ही न्यायालयीन स्थगिती नसलेली अनधिकृत बांधकामे आज (दिनांक १० जानेवारी, २०१७)निष्कासित करण्यात आली. तसेच भूमाफीया मोहम्मद कल्लू शाह याच्याविरुद्ध एम.आर.टी.पी. कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन एकरच्या भूखंडावर बृहन्मुंबई महानगरपालिकेची वेगवेगळी आरक्षणे असून त्यामध्ये रस्ता, अग्निशमन दल, महापालिका रुग्णालय, महापालिका दवाखाना व हरित पट्टा या आरक्षणांचा समावेश आहे. गेल्या ८-१० वर्षांपासून या भूमाफीयाने सदर जागेवर अतिक्रमण करुन मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभारली होती. तसेच नर्सरी, खडी-रेतीवाले, वाहनतळ अशा निरनिराळ्या व्यावसायिकांच्या वापराकरिता सदर जागा त्याने भाडय़ाने दिली होती. सदर भूमाफीयाने ३० ते ४० खोटी प्रकरणे न्यायालयात दाखल करुन बृहन्मुंबई महानगरपालिकेची तसेच न्यायालयाची दिशाभूल करण्याचे काम केले होते. या भूमाफीया विरुद्ध अनेक वर्षांपासून तक्रारी दाखल होत्या, तसेच तो अवैध व्यवसायास प्रोत्साहन देत असल्याने, नागरिकांचाही त्याच्यावर रोष होता.

उपायुक्त (परिमंडळ-६) नरेंद्र बर्डे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आयुक्त सुधांशु द्विवेदी यांनी ६ जे.सी.बी., २ पोकलेन, अनुज्ञापन परवाना विभागाच्या ६ गाडय़ा, खासगी व महापालिकेचे १५ डंपर, ५० पोलिस, २० पोलिस अधिकारी व महापालिकेचे १०० कर्मचारी यांच्या सहाय्याने ही सर्व अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त करण्याची कार्यवाही पार पाडली. सदर मोकळा करण्यात आलेला व विविध आरक्षणे असलेला २ एकरचा भूखंड महापालिकेने ताब्यात घेतला असून त्यास कुंपणही घातले आहे. तसेच लगतची 'बेस्ट'ची जमिन 'बेस्ट' कडे सूपूर्द करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages