बृहन्मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे दरवर्षी झाडे, फुले, फळे, भाज्या व वृक्षांचे भव्य प्रदर्शन राणीच्या बागेत आयोजित करण्यात येत असते. याच प्रदर्शनादरम्यान विविध गटांमध्ये उद्यान विषयक स्पर्धा देखील आयोजित करण्यात येत असते. हे गट प्रामुख्याने 'इनडोअर' व 'आऊट डोअर' अशा दोन विभागात विभागलेले असतात. 'इनडोअर' विभागात प्रामुख्याने कुंड्यांमधील फळभाज्या, पालेभाज्या, फुलझाडे, औषधी वनस्पती, गुलाब रोपे आणि वैशिष्ट्येपूर्ण मांडणी या गटांचा समावेश होता. तर 'आऊट डोअर' विभागात वृक्ष संवर्धन, खाजगी उद्याने, खाजगी संस्थांद्वारे परिरक्षित (Maintain) करण्यात येणारी वाहतूक बेटे व रस्ते दुभाजक, पोडियम उद्याने, छतावरील उद्याने (Terrace Garden), संकल्पनेवर आधारित उद्याने (Landscape Garden), उभी उद्याने (Vertical Garden) आदी गटांचा समावेश होता.
खाजगी व शासकीय संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविलेल्या या स्पर्धेत १६ मुख्य गट व ६ उपगट होते. यानुसार सर्व २२ गटांमध्ये पहिले व दुसरे पारितोषिक याप्रमाणे ४४ पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासर्व गटांमध्ये अशोका टॉवर सहकारी गृहरचना संस्था, गोदरेज व बॉइस, आयटीसी मराठा हॉटेल, एचपीसीएल, हॉटेल रिट्रीट, बी.मोंड सहकारी गृहरचना संस्था, हिरानंदानी ग्रुप, ताज सांताक्रूझ हॉटेल, भारतीय स्टेट बँक, के. आर. फाऊंडेशन, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि., के. रहेजा रीयालिटी, महेंद्रा ऍण्ड महेंद्रा, ओबेरॉय स्प्रींग, कासा ग्रान्डे आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आदी संस्था विजयी ठरल्या. या संस्थांच्या प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे आयोजित या स्पर्धेला वृक्ष प्राधिकरणाचे माजी सदस्य हनुमंत राणे हे मुख्य परिक्षक म्हणून लाभले होते. तर वृक्ष प्राधिकरण सदस्य सुभाष पाटणे, भाभा आण्विक संशोधन केंद्राच्या उद्यान विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत साळुंखे, राज्य शासनाच्या उद्यान विभागातील संचाल विजय गोविंद रावळ, माहिम निसर्ग उद्यानाचेअविनाश कुबल यांच्यासह संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी या स्पर्धेच्या विविध गटांचे परिक्षक म्हणून काम पहिले, अशीही माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे आयोजित या वर्षीच्या प्रदर्शनादरम्यान फुलांपासून तयार करण्यात आलेली मिकी माऊस सोबतच डोरेमॉन, डोनाल्ड डक, गुफी, स्नोव्हाईट, कार्टून कॅरेक्टर्स आधारित पुष्प रचना, ऍनाकोंडा हे यावर्षीच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले होते. याचसोबत या प्रदर्शनात कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, परदेशी भाज्या, बोनसाय अर्थात बटुवृक्ष इत्यादींचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पहायला मिळाले.