कंत्राटदारांची राखीव रक्कम व ठेव परतीची पडताळणी संगणकीय पद्धतीने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 January 2017

कंत्राटदारांची राखीव रक्कम व ठेव परतीची पडताळणी संगणकीय पद्धतीने

योग्य काम न करणा-या कंत्राटदाराच्या रकमेतून वजावटही संगणकीय पद्धतीने - मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदारांना त्यांनी केलेल्या कामाच्या हमी कालावधीनंतर कंत्राट ठेव व कामाच्या रकमेच्या ५ टक्के राखून ठेवलेली रक्कम परत दिली जाते. ही रक्कम परत देताना सदर कंत्राटदाराने केलेल्या इतर कामांच्या अनुषंगाने काही येणे रक्कम आहे का? याची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभाग व खात्यांकडे पत्र पाठवून विचारणा करण्याची आतापर्यंतची पद्धत होती. यामुळे काही प्रकरणात ही माहिती मिळण्यास विलंब होत असे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आता या बाबी 'इआरपी सॉफ्टवेअर' (SAP) आधारित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे योग्यप्रकारे काम करणा-या व हमी कालावधीत योग्य सेवा देणा-या कंत्राटदारांना त्यांची रक्कम तत्काळ मिळू शकणार आहे. तर काम योग्यप्रकारे न करणा-या कंत्राटदारांच्या जमा रकमेतून आवश्यक ती रक्कम व दंड कापून घेणे सुलभ होणार आहे, अशी माहिती प्रमुख लेखापाल (वित्त) ह. शं. निकम यांनी दिली आहे. 
याबाबत अधिक माहिती देताना निकम यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महापालिकेची विविध नागरी सेवा सुविधा विषयक कामे कंत्राटदारांकडून करवून घेतली जातात. यासाठी निविदा प्रक्रियेअंती कंत्राटदाराची निवड होत असते. या सर्व प्रक्रियेदरम्यान कंत्राटदाराकडून कंत्राट ठेव (Contract Deposit) घेतली जाते. तसेच कंत्राटदाराने काम पूर्ण केल्यानंतर एकूण देयकाच्या ५ टक्के रक्कम ही महापालिकेकडेच राखून ठेवण्यात येत असते. जेणेकरुन हमी कालावधी दरम्यान कामात त्रुटी आढळल्यास त्याबाबतची वसूली कंत्राटदाराच्या ठेवीमधून व राखीव रकमेतून केली जाते.

तसेच हमी कालावधी दरम्यान कामात त्रुटी न आढळल्यास सदर रक्कम कंत्राटदारला अदा केली जाते. मात्र अनेक कंत्राटदार हे महापालिकेच्या विविध खात्यांसाठी व विभागांसाठी काम करत असतात. ही बाब लक्षात घेऊन कंत्राटदाराला कंत्राट ठेव व राखीव रक्कम परत करण्यापूर्वी महापालिकेच्या सर्व विभागांना व खात्यांना पत्र पाठवून कंत्राटदाराकडे इतर कंत्राटांच्या अनुषंगाने काही येणी आहेत का? याची माहिती घेण्याची महापालिकेची आजवरची पद्धत होती.

मात्र यामध्ये कालापव्यय व विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन आता महापालिकेच्या सर्व कंत्राटदारांबाबत त्यांच्याकडून येणे असलेली रक्कम 'इआरपी' सॉफ्टवेअर अंतर्गत दर्शविण्याची सुविधा विकसित करण्यात आली आहे. या अंतर्गत प्रत्येक कंत्राटदाराच्या नोंदणी क्रमांकानुसार सदर कंत्राटदारकडे किती रक्कम येणे आहे, याची तत्काळ माहिती महापालिकेच्या सर्व विभाग व खात्यांना संगणकीय पद्धतीने होणार आहे. तसेच याप्रकारे सॉफ्टवेअर आधारित तपासणी केल्यानंतरच संबंधित कंत्राटदाराला संबंधित रक्कम अदा केली जाणार आहे. यामुळे काम सुयोग्यप्रकारे करणा-या कंत्राटदारांना त्यांची बाकी रक्कम लवकर मिळू शकणार आहे. तर काम न करणा-या कंत्राटदारांकडून यथायोग्य रक्कम वसूल करणे शक्य होणार आहे.

Post Bottom Ad