मुंबई (प्रतिनिधी): बेस्टचे सन २०१७ - १८ चा 560 कोटीहुन अधिक तुटीचा अर्थसंकल्प आज पालिका सभागृहात मंजुरीसाठी आणला होता, मात्र सदर अर्थसंकल्प हा नियमानुसार नसल्याने व अर्थसंकल्प मांडताना किमान एक लाखाची शिल्लक दाखविण्याचा नियम असल्याने पालिका सभागृहात अर्थसंकल्पाचा प्रस्ताव मंजूर न करता परत बेस्टकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी उपसूचना मांडत बेस्ट अर्थसंकल्प परत पाठविण्याची मागणी केली होती.
यापूर्वी बेस्ट समिती मध्ये तुटीच्या अर्थसंकल्पाला काँग्रेसकडून विरोध करण्यात आला, मात्र बेस्ट च्या महाव्यवस्थापकांच्या खुलाशानंतर बेस्ट अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आलीं होती. त्यानंतर सदर अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेत मंजुरीसाठी पाठविण्यात आला. पालिकेत स्थायी समितीत बेस्टच्या अर्थसंकल्पाला विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी विरोध करत तुटीचा अर्थसंकल्प सादर करणे चुकीचे असल्याचे सांगत सदर अर्थसंकल्प मंजूर न करण्याची व बेस्ट अर्थसंकल्प पुन्हा बेस्ट प्रशासनाकडे पाठविण्यात यावे असे सांगितले होते, मात्र स्थायी समितीला अर्थसंकल्प परत पाठविण्याचे अधिकार नसल्याने हा अर्थसंकल्प पालिका सभागृहात मांडून परत पाठविण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. त्यानुसार आज सभागृहाकड़े अर्थसंकल्प मंजूरीसाठी आला असता सभागृहाने अर्थसंकल्प बेस्टकड़े परत पाठवला आहे.