मुंबई : मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अँकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ७४ व्या आंतरशालेय हिंद करंडक स्पर्धेत कबड्डी, खो खो, लंगडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये शालेय मुली गटात वांद्रय़ाच्या महात्मा गांधी विद्यामंदिरने राणी लक्ष्मीबाई हिंद करंडक, तर शालेय मुले गटात कोपरखैरणोच्या रा. फ. नाईक विद्यालयाने टोपीवाला हिंद करंडक पटकावला. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात मुंबई-ठाणो परिसरातील एकूण १२४ शालेय संघांच्या सहभागाने झालेल्या हिंद करंडक स्पर्धेत मुलींमध्ये महात्मा गांधी विद्यामंदिरने सर्वाधिक १३ गुण तर मुलांमध्ये रा. फ. नाईक विद्यालयाने सर्वाधिक १0 गुण मिळवले.
हिंद करंडक शालेय मुली गटात महात्मा गांधी विद्यामंदिरने कबड्डी व लंगडीचे अंतिम विजेतेपद आणि खो-खोचे अंतिम उपविजेतेपद पटकावून १३ गुणांची नोंद केली. कबड्डीमध्ये अंतिम फेरीत महात्मा गांधी विद्यामंदिरने चढाईपटू करिना कामतेकरच्या अप्रतिम खेळामुळे लक्ष्मी विद्यालय-ठाणो संघावर ६१-४८ असा विजय मिळवला, तर लंगडीमध्ये अंतिम फेरीत महात्मा गांधी विद्यामंदिरने श्रावणी चव्हाणच्या उत्कृष्ट संरक्षणामुळे के.एम.एस. डॉ. शिरोडकर हायस्कूलचा ९ गुणांनी पराभव केला. खो-खोची अंतिम फेरी रा. फ. नाईक विद्यालयाने पूजा फरगडेच्या (२.४८ मि. संरक्षण व ७ गडी) अष्टपैलू खेळामुळे जिंकताना महात्मा गांधी विद्यामंदिर संघाला ५ गुणांनी हरवले.
शालेय मुलांचा टोपीवाला हिंद करंडक पटकावताना कोपरखैरणोच्या रा. फ. नाईक विद्यालयाने खो-खोचे अजिंक्यपद व कबड्डीचे उपविजेतेपद पटकावले. अष्टपैलू गिरीश काळे (३.३८ मि. संरक्षण व २ गडी) व अभिषेक शिंदेच्या (५ गडी) आक्रमक खेळामुळे खो-खोच्या अंतिम फेरीत रा. फ. नाईक विद्यालयाने महात्मा गांधी विद्यामंदिर संघाचा एका डावाने पराभव केला. कबड्डीच्या अंतिम फेरीत शारदाश्रम विद्यामंदिर मराठी माध्यम शाळेने पहिल्या डावात आघाडी घेणार्या रा. फ. नाईक विद्यालय संघाचा ४७-४३ असा निसटता पराभव केला. लंगडी खेळाचे अजिंक्यपद डॉ. त्रि. रा. नरवणो हायस्कूल संघाने साहिल भायेच्या अष्टपैलू खेळामुळे पटकावताना शारदाश्रम विद्यामंदिरवर ३९-३२ असा विजय मिळवला.
क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे, प्राचार्य डॉ. गो. वि. पारगावकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यकारी सदस्य महेश विचारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, डॉ. घनश्याम धोकरट, दीपक कांदळगावकर, नलिनी फडणीस, सच्चीद्र आयरे, भारत संधाने, प्रकाश साळुंखे, रवींद्र करमरकर, पानसरे सर, बंडू कांबळे आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत हिंद करंडक विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.