मुंबई : मुंबई महानगरपालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुक होऊ घातली असताना शिवसेना सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाने नव्या विकासकामांचे भूमिपूजन केले. मात्र, घाटकोपर गौरी शंकर वाडी येथे तीन वर्षापूर्वी बांधलेले नाट्यगृह आजही उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. एसआरए ने हे नाट्यगृह पालिकेकडे हस्तांतरित न केल्याने आणि पालिकेने हे नाट्यगृह आपल्या ताब्यात न घेतल्याने हे नाट्यगृह गुरांचा गोठा व समाजकंटकांच्या अड्डा बनलेले आहे.
घाटकोपर, पंतनगर विभागात गौरीशंकर वाडीत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या भूखंडाचा काही भाग नाट्यगृहासाठी आरक्षित करण्यात आला होता. विकासकाने त्या जागी एक भव्य तीनशे आसने असलेले नाट्यगृह उभारले; परंतु खाजगी शुल्लक वादामुळे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने या नाट्यगृहाचे ताबा पत्र मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागाकडे दिले नाही. एसआरएने पालिकेला ताबा पत्र दिले नाही आणि पालिका अधिकार्यांनी देखील या नाट्यगृहाला ताब्यात घेण्यासाठी आवश्यक हालचाली न केल्याने नाट्यगृहाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याबाबत विभागातील नाट्यप्रेमींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
परिणामी, गेल्या तीन वर्षांत कागदी घोडे नाचवून एसआरए आणि पालिकार्यांनी या नाट्यगृहाचे घोंगडे भिजतच ठेवले आहे. एसआरए आणि पालिकेच्या 'एन' विभागाच्या निष्क्रिय अधिकार्यांमुळे हे नाट्यगृह म्हणजे गुरांचा गोठा झाला आहे. या ठिकाणी एका इसमाने गाय, बैल आणि वासरे आणून बांधली तर आहेतच, त्याचबरोबर या बंद असलेल्या इमारतीमध्ये सर्रास समाजकंटक मद्यप्राशन करत असल्याचेही आढळून येत आहे. या ठिकाणी निर्माण झालेली दुर्गंधी व नाट्यगृह समाजकंटकांपासून मुक्त करण्यासाठी नाट्यगृह लवकरात लवकर चालू करावे असे मत व्यक्त केले आहे. नाट्यगृहाच्या लाल फितीत अडकलेल्या कारभाराबद्दल एसआरएच्या अधिकार्यांना विचारले असता याबाबत प्रत्येक अधिकारी टोलवाटोलवी करत आहे तर पालिकेचे 'एन' विभागातील सहाय्यक आयुक्तांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शवला.
नाट्यगृह सुरू का करत नाहीत? गेल्या दोन वर्षांपासून मी हे नाट्यगृह सुरू होण्यासाठी पाठपुरावा करून देखील सत्ताधारी पक्ष आणि शासकीय अधिकारी मात्र याबाबत निरसता दाखवत आहेत. सध्या भूमिपूजन आणि उदघाटनाचा धडाका लावणारे सत्ताधारी हे नाट्यगृह सुरू का करत नाहीत?
- राखी जाधव (स्थानिक नगरसेविका)
नाट्यगृह सुरू का करत नाहीत? गेल्या दोन वर्षांपासून मी हे नाट्यगृह सुरू होण्यासाठी पाठपुरावा करून देखील सत्ताधारी पक्ष आणि शासकीय अधिकारी मात्र याबाबत निरसता दाखवत आहेत. सध्या भूमिपूजन आणि उदघाटनाचा धडाका लावणारे सत्ताधारी हे नाट्यगृह सुरू का करत नाहीत?
- राखी जाधव (स्थानिक नगरसेविका)