काँग्रेसतर्फे १८ जानेवारीला देशातील ३३ आरबीआय कार्यालयाला घेराव -
मुंबई / प्रतिनिधी / 16 Jan 2017 -
आगामी महानगरपालिका निवडणुकीत मुंबई काँग्रेसतर्फे पथनाट्याद्वारे संपूर्ण मुंबईभर प्रचार आणि प्रसार करणार आहोत. या पथनाट्यामध्ये शिवसेना व भाजपा युतीने गेली २२ वर्षे जो मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार केला, मुंबईतील अनेक समस्या, अडचणी व ज्वलंत प्रश्न यांची माहिती देण्यात येणार आहे तसेच नोटाबंदीचा राष्ट्रीय प्रश्न हि लोकांसमोर मांडणार आहोत. हे पथनाट्य शाहिर साबळे यांचे नातू व दिग्दर्शक केदार शिंदेचे भाऊ मंदार शिंदे तयार केलेले आहे. मुंबईत २० जानेवारी ते १९ फेब्रुवारी पर्यंत दररोज ५ ठिकाणी हे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. या पथनाट्यामध्ये नोटाबंदी, मुंबईतील अस्वच्छता, पेंग्विन हट्ट, मुंबईतील हॉस्पिटल्सची दुरावस्था, मुंबई महानगरपालिकेतील लाचखोरी व घोटाळे, रोगराई असे विषय घेतलेले आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, आरबीआय नोटाबंदीच्या विषयावर पूर्णतः अपयशी ठरलेली आहे त्यामुळे बुधवार, १८ जानेवारी २०१७ रोजी दुपारी १२.०० वाजता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे संपूर्ण देशातील ३३ आरबीआय कार्यालयाला घेराव घालणार आहोत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसतर्फे देखील मुंबईतील आरबीआय कार्यालयावर घेराव घालणार आहोत. यामध्ये काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
संजय निरुपम पुढे म्हणाले की, मुंबईत मुंबई काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, फक्त जोगेंद्र कवाडे याच्या आरपीआय पक्षाला काही जागा देणार आहोत. मुंबईतील सर्व नेत्यांची इच्छा आणि मत आहे की मुंबईत स्वबळावर लढावे त्यानुसार आम्ही दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना कळविले आणि त्यांनी आम्हाला अनुमती दिलेली आहे. त्यामुळे मुंबईत मुंबई काँग्रेस कोणाशी ही युती न करता स्वबळावर लढणार आहे.
सदर पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत माजी खासदार मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, बिहारचे आमदार अजित शर्मा, माजी आमदार चरणसिंह सपरा, युसुफ अब्राहनी, मनपा विरोधी पक्षनेता प्रविण छेडा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील उपस्थित होते.
स्वच्छ मोफत पाणी, खड्डेमुक्त रस्ते, कचरामुक्त मुंबई
मुंबईला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठयापैकी २७ टक्के पाण्याची चोरी होते. ७५० दशलक्ष पाण्याची चोरी होत असल्याने ही पाणीचोरी रोखायची असल्यास मोफत पाणी दिले गेले पाहिजे. काँग्रेसची सत्ता आल्यास नागरिकांना काही प्रमाणात मोफत पाणी दिले जाईल. जेणे करून सर्वानांच पाणी मोफत मिळत असल्याने पाणीचोरी आपोआप कमी होईल. याच बरोबर खड्डेमुक्त रस्ते व कचरामुक्त मुंबई करू अश्या मुद्द्यांचा सामावेश जाहीरनाम्यात असेल. हा जाहिरनामा लेकराचं प्रसिद्ध करणार असल्याचे निरुपम यांनी सांगितले.
नगरसेवकांना तिकीट पक्के
मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढत असल्याने सर्वच्या सर्व २२७ जागांवर उमेदवार उभे केले जाणार आहेत. यामुळे सध्या नगरसेवक असलेल्या कोणाचेही तिकीट कापले जाणार नाही. या नगरसेवकांना आगामी निवडणुकीमध्ये नक्की उमेदवारी मिळणार आहे. ज्या नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत अश्या नगरसेवकांच्या घरातील व्यक्तींला तिकीट दिले जाणार आहे. इतर ठिकाणी निवडून येण्याची ताकद असलेल्याना उमेदवारी दिली जाणार आहे. ज्या वॉर्ड मधून एक अर्ज आला किंवा तेथील नेत्यांनी सामोपचाराने एकच उमेदवार दिला अश्या वॉर्ड मधील उमेदवारांची यादी येत्या आठवडाभरात जाहीर केली जाणार आहे. जिथे अनेक अर्ज आले आहेत तिथे सामोपचाराने मार काढून यादी जाहीर केली जाईल असे निरुपम यांनी सांगितले.