मॅरेथॉनमध्ये अडीच हजार स्पर्धक जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 January 2017

मॅरेथॉनमध्ये अडीच हजार स्पर्धक जखमी

मुंबई : मुंबईत रविवारी (१५ जानेवारी) संपन्न झालेल्या मॅरेथॉनमध्ये तब्बल ४२ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला असून त्यामधील अडीच हजार स्पर्धक जखमी झाले यामध्ये औरंगाबादचे पोलीस उपायुक्त निसार तांबोळी हे सुद्धा असल्याची माहिती आयोजकांनी दिली, किरकोळ दुखापत झालेल्या ११ जणांवर उपचार करून सोडण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मॅरेथॉन स्पर्धेत अपघातांत घट झाल्याची माहिती डॉ. विजय डिसिल्व्हा यांनी दिली.

मुंबई मध्ये गेले १४ वर्ष मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जात आहे. गेल्या दोन वर्षांतील मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचा विचार करता, यंदा प्रशिक्षित स्पर्धकांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले, अशी माहिती डिसिल्व्हा यांनी दिली. संपूर्ण मॅरेथॉनच्या मार्गावर ११ वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले होते, शिवाय ४० आणि २० खाटांचे दोन बेस कॅम्पही या ठिकाणी होते.

हृदयविकारावरील उपचारांकरिता विशेष ११ रुग्णवाहिकाही होत्या. मॅरेथॉनच्या मार्गावर दुचाकींवर डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवा पोहोचविणाऱ्या सात दुचाकी होत्या, तर डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ मिळून एकूण ५०० जणांचा चमू वैद्यकीय सेवेसाठी हजर होता.

औरंगाबादचे पोलीस उपायुक्तही रुग्णालयात 
औरंगाबादचे पोलीस उपायुक्त निसार तांबोळी (४७) रविवारी मॅरेथॉनमध्ये धावताना अचानक कोसळले. काही काळ ते बेशुद्धावस्थेत होते, त्यांना त्वरित मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, प्राथमिक तपासात तांबोळी यांना डीहायड्रेशनचा त्रास झाल्याचे निदान करण्यात आले. त्यांना आणखी एक दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शोएब पदारिया यांनी दिली.

Post Bottom Ad