मुंबई : नोटबंदीमुळे बँक कर्मचार्यांवरील ताण वाढला आहे. अतिरिक्त काम करून त्रस्त झाल्याने आता निवडणूक 'ड्युटी' नको, असा पवित्रा बँक कर्मचार्यांच्या संघटनेने घेतला आहे. देशातील पाच राज्यांतील विधानसभा तसेच महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषदांच्याही निवडणुका होत असल्याने त्याचा ताणही बँक कर्मचार्यांवर पडण्याची शक्यता असल्याने त्यापासून सुटका करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेने (एनओबीडब्ल्यू) निवडणूक आयोग आणि अर्थ मंत्रालयाकडे या संदर्भातील विनंती करणारे पत्र पाठवले आहे. भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या या संघटनेने मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांना पाठवलेल्या पत्रात बँक कर्मचार्यांना निवडणुकांची कामे देऊ नयेत, अशी विनंती केली आहे. नोटबंदीचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर बँक कर्मचार्यांनी गेल्या ५0 दिवसांत १२ ते १८ तास काम केले आहे. अद्यापि त्यांची या कामातून सुटका झालेली नाही. उशिरापर्यंत कार्यालयांमध्ये थांबून ते प्रलंबित कामे मार्गी लावत आहेत तसेच जुन्या नोटांची आकडेवारी आणि माहिती जमा करण्याचे काम करत आहेत. त्यांना नोटबंदी आणि आर्थिक वर्षाची अखेरी असल्यामुळे ती कामेही करावी लागत आहेत. त्यामुळे निवडणूक काम देण्यात येऊ नये, असे बँक संघटनेने अर्थ मंत्रालय आणि निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
बँक कर्मचार्यांना जर निवडणूक कामाला जुंपले गेले तर बँकांच्या कामकाजावर त्याचा परिणाम होईल तसेच बँक कर्मचार्यांवरील ताण वाढण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षांनी सांगितले.