अहमदनगर जिल्ह्यातील बनावट दारू विक्री संदर्भातील लक्षवेधी सूचना विधानसभा सदस्य किसन कथोरे यांनी मांडली होती. यावेळी बाळासाहेब मुरकुटे, सरदार तारासिंग यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्याला उत्तर देताना बावनकुळे यांनी माहिती दिली.
बावनकुळे म्हणाले, जिल्हा रूग्णालयाच्या उपाहारगृहात बनावट दारू बनविणे हा गंभीर गुन्हा असून, या उपहारगृहाच्या संदर्भात १४ अनियमितता आढळल्या आहेत. संबंधीत गुन्ह्यासंदर्भांत १९ जणांवर ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण १६ जणांना अटक करण्यात आली असून, मोक्का लावण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्रातील बनावट दारू बनविण्याच्या व्यवसायातील सर्वांत मोठा गुन्हेगार असलेल्या अट्टल गुन्हेगार दादा वाणी यास अटक करण्यात राज्य शासनाला यश मिळाले आहे. या गुन्हेगारावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यासंदर्भात कडक कारवाई करीत आहे.
राज्यातील सर्व जिल्हा रूग्णालयातील उपाहारगृहाची पाहणी आरोग्य मंत्र्यांच्या आदेशानुसार करण्यात येईल. तसेच संबंधीत आरोग्य विभागाच्या अधिका-यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असेही बावनकुळे यांनी सांगितले. या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
