मोठ्या नाल्यांच्या सफाईची कामे १ एप्रिलपासून सुरु होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोठ्या नाल्यांच्या सफाईची कामे १ एप्रिलपासून सुरु होणार

Share This


मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मोठ्या नाल्यांच्या सफाई कामांची निविदा प्र॑क्रिया आता अंतिम टप्प्यात असून ही कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार १ एप्रिल २०१७ पासून सुरु करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकी दरम्यान दिले आहेत. त्याचबरोबर छोट्या नाल्यांच्या निविदा प्रक्रियेस कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने ही कामे गेल्यावर्षीप्रमाणेच विभाग स्तरावर व स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांच्या मदतीने करण्याची कार्यवाही ७ एप्रिलपासून सुरु करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व ७ परिमंडळांचे उपायुक्त आणि २४ प्रशासकीय विभागांचे सहाय्यक आयुक्त यांनी नालेसफाई संबंधीच्या सर्व कामांची पाहणी काळजीपूर्वक करावी आणि ही सर्व कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसारच गुणवत्तापूर्णरित्या होतील, याची खबरदारी घ्यावी असेही आदेश या बैठकी दरम्यान देण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह सर्व संबंधित उपायुक्त, व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राचे भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेता दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मोठ्या व छोट्या नाल्यांच्या सफाईची कामे बृहन्मुंबई महापालिकेद्वारे केली जात असतात. मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी महानगरपालिकेच्या पर्जन्यजल वाहिन्या खात्याद्वारे निविदा प्रक्रिया राबविली जाते. मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी ३० गटांनुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापैकी २४ गटातील मोठ्या नाल्यांच्या सफाईचे कार्यादेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. तर उर्वरित ६ गटांची निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून त्याबाबतचेही कार्यादेश यशस्वी निविदाकारास लवकरच देण्यात येणार आहेत.

छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी ४ वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र, या निविदा प्रक्रियेस प्रतिसाद न मिळाल्याने छोट्या नाल्यांची सफाई ही गेल्यावर्षी प्रमाणेच विभाग स्तरावर स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांच्या मदतीने करण्यात यावी. याप्रकारे सफाई करण्यासाठी एकूण ३ लाख ७० हजार ९५४ एवढे मानवी दिवस लागणार आहेत.

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्यांच्या बाजूला असणारी जाळीची झाकणे (Water Entrances), या जाळीच्या झाकणांपासून पर्जन्यजल वाहिन्यांपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी असणा-या छोट्या वाहिन्या (Laterals) तसेच रस्त्याच्या बाजूला असणा-या पर्जन्यजल वाहिन्या (Road Side Drains) इत्यादींच्या सफाईची कामे १ एप्रिल २०१७ पासून सुरु करावीत, तसेच याबाबतची कार्यवाही परिमंडळीय उपायुक्त व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्त यांच्या स्तरावर करण्यात यावेत, असेही आदेश बैठकी दरम्यान देण्यात आले. या कामांसाठी एकूण २ लाख २४ हजार ७२३ एवढे मानवी दिवस लागणार आहेत.

बृहन्मुंबई महापलिका क्षेत्रात २५१.१९ किमी एवढ्या लांबीचे मोठे नाले (Major Nalla) आहेत, तर ४१८.७५ किमी एवढ्या लांबीचे छोटे नाले (Minor Nalla) आहेत. या व्यतिरिक्त मिठी नदीचे १७.८ किमी लांबीचे अंतर व वाकोला नदीचे ३.७ किमी लांबीचे अंतर यांचीही सफाई मनपा द्वारे करण्यात येते.

> पावसाळापूर्व आरोग्यविषयक खबरदारीपावसाळ्यादरम्यान जलजन्य व कीटकजन्य आजारांची संभाव्यता लक्षात घेता महापालिकेच्या स्तरावरील आवश्यक ती सर्व कार्यवाही काटेकोरपणे करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य खात्याला देण्यात आले.

महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या संस्थांच्या मालकीच्या जमिनी वा इमारती आहेत. या इमारतींमध्ये देखील आवश्यक ती सर्व काळजी घेतली जावी, विशेष करुन या परिसरांमध्ये पाणी साचणार नाही याचीही दक्षता प्रभावीपणे घेतली जावी, यासाठी सर्व संबंधित संस्थांना पत्र द्यावे. तसेच या नंतरही संबंधित संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही केली नाही, तर त्या संस्थेच्या सर्वेाच्च पदावरील व्यक्तीवर संबंधित नियमांन्वये कारवाई करण्याचेही आदेश बैठकीदरम्यान दिले आहेत.

खाद्यपदार्थ / पेयपदार्थ विक्रेते यांच्या कडील पदार्थ, बर्फ, पाणी इत्यादींची नमूना चाचणी नियमीतपणे करावी, तसेच चाचणी मध्ये अयोग्य ठरणा-या नमुन्यांबाबत त्वरीत व कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages