1 मे च्या ग्रामसभेत माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या शासन निर्णयाचे प्रकट वाचन करावे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

1 मे च्या ग्रामसभेत माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या शासन निर्णयाचे प्रकट वाचन करावे

Share This

मुंबई, दि. 29 : राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरीता 1 मे महाराष्ट्र दिनी ग्रामसभेत योजनेच्या शासन निर्णयाचे प्रकट वाचन करावे, असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले असून या आशयाचे पत्र त्यांनी राज्यातील सर्व सरपंचांना पाठविले आहे.

महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे योजनेविषयी माहिती देताना म्हणाल्या की, राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरीता आर्थिक तरतूद करणे, भ्रुणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बाल विवाह रोखणे आणि मुलांइतकाच मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने ही योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेद्वारे बी.पी.एल. व ए.पी.एल. कुटुंबात जन्मास येणाऱ्या मुलीच्या नावे रु. २१ हजार एवढी रक्कम आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून, लाभार्थी मुलीस वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण एक लाख रुपये एवढी रक्कम प्रदान करण्यात येते. शिवाय जे दांम्पत्य पहिल्या मुलगी अपत्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करेल त्यांना मुलीचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी ५ हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना राबविताना क्षेत्रिय कार्यालयांना येत असलेल्या अडचणी विचारात घेऊन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुस्पष्टता व सुसूत्रता येण्यासाठी स्पष्टीकरणात्मक सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याबाबत सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) व सर्व महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे कामकाज आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे सोपविण्यात येऊन त्यांनी या योजनेचा सामंजस्य करार तात्काळ भारतीय आयुर्विमा महामंडळ यांचेसोबत करणेबाबत आदेशित करण्यात आल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages