पालिका रुग्णालय प्रशासनाचे धिंडवडे -
मुंबई / अजेयकुमार जाधव -
रुग्णालयामधून लहान मुले पळवण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र मुंबई महानगर पालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातून चक्क एक चालता न येणारा वयोवृद्ध रुग्ण गायब झाल्याची घटना घडली आहे. रुग्णालयातून पेशंट गायब झाल्याची घटना रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत नसल्याचे उघड झाल्याने पालिका रुग्णालय प्रशासनाचे आणि सत्ताधाऱ्यांचे धिंडवडे निघाले आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार देविदास किसन आंबोरे या ६५ वर्षीय वयोवृद्ध व लकवा मारलेल्या रुग्णाला मुंबई महापालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात वॉर्ड नंबर १२ मध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी २४ एप्रिलला सकाळी ७.३० च्या दरम्यान देविदास यांच्या पत्नीने आपल्या नवऱ्याला नास्टा देण्यासाठी तोंड धुतले आणि स्वतःही तोंड धुण्यासाठी गेल्या. देविदास यांच्या पत्नी परत बेड जवळ आल्या असता आपले पती बेड वर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपल्या पतीला चालता हलता येत नसताना आपले पती बेड वर नसल्याने वॉर्ड मध्ये आणि रुग्णालयामध्ये शोधाशोध केली असता देविदास कोठेही सापडले नसल्याने देविदास यांच्या पत्नी व मुलगी यांनी थेट टिळक नगर पोलीस स्टेशन गाठून देविदास हरवल्याची तक्रार दिली आहे.
मुंबई महापालिका किंवा राज्य सरकारच्या रुग्णालयातून रुग्ण गायब झाल्यास रुग्णालय प्रशासनाने पोलीस ठाण्यात तक्रार देणे बंधनकारक आहे. परंतू राजावाडी रुग्णालयातील प्रशासनाला सायंकाळी ४.३० पर्यंत हा प्रकारचं माहीत नव्हता. मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा असलेल्या रोहिणी कांबळे यांनी आज सकाळीच राजावाडी रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालय प्रशासनाला देविदास आंबोरे रुग्णालयातून गायब झाल्याचे माहीत नसल्याने या भेटी दरम्यान आरोग्य समितीच्या अध्यक्षांच्या निदर्शनास हा प्रकार आलेला नाही. सायंकाळी महापालिका मुख्यालयात आरोग्य समितीच्या अध्यक्षांच्या निदर्शनास सादर प्रकार निदर्शनास आणल्यावर मी माहिती घेऊन सांगते असे पत्रकाराना सांगितले. काही वेळाने पत्रकारांनी रोहिणी कांबळे यांच्याशी संपर्क साधल्यावर रुग्ण हरवला आहे हे खरे असले तरी रुग्ण मानसिक आजारी होता. रुग्णालय प्रशासनाने रुग्ण हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली असल्याची माहिती रुग्णालयातून दिल्याचे कांबळे यांनी सांगितले. मात्र टिळक नगर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता देविदास आंबोरे हा रुग्ण राजावाडी रुग्णालयातून गायब झाल्याने मिसिंग तक्रार नोंदवण्यात आली आहे. हि तक्रार राजावाडी रुग्णालयातून नव्हे तर त्यांची मुलगी गंगा सुरेश वानखडे यांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातून एक वयोवृद्ध लकवा मारल्याने एक हाताने व पायाने कोणतेही काम करू न शकणारा, एखाद्या व्यक्तीने सहारा दिल्याशिवाय चालू न शकणार रुग्ण गायब झाला आहे. रुग्नालयातून रुग्ण गायब झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आलेली नाही. आरोग्य समितीच्या अध्यक्षा रोहिणी कांबळे यांच्या निदर्शनास सादर प्रकार आणल्यावर रुग्णालय प्रशासनाला सायंकाळी ४.३० नंतर हा प्रकार समजल्याने आपल्या रुग्णालयात कोणते प्रकार घडतात हे प्रशासनाला माहित नसतात का ? एखादा रुग्ण रुग्णालयातून गायब झाला तेव्हा सुरक्षा रक्षक काय करत होते ? रुग्ण गायब झाल्याचे रुग्णालयात सांगितल्यावर रुग्णाच्या नातेवाईकांना प्रशासनाने काय कारवाई केली ? असे अनेक प्रश्न उऊपस्थित होत असून या प्रकारणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देविदास आंबोरे यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
No comments:
Post a Comment