सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या बंगल्याला शनिवारी मूकबधिरांचा घेराव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 April 2017

सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या बंगल्याला शनिवारी मूकबधिरांचा घेराव


मुंबई / प्रतिनिधी - मुंबई बांद्रा येथील मूक बधिरांसाठी अली यावर जंग हि राष्ट्रीय संस्था सुरु आहे. या संस्थेच्या माध्यमातून मूक बधिरांना शिक्षण देण्याचे तसेच नोकरी लावण्यासाठी प्रयत्न केले जातात. या संस्थेला केंद्र सरकारचे अनुदान मिळत असते. संस्थेला मिळणारे अनुदान आणि दिल्या जाणाऱ्या नोकऱ्या यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे मात्र केंद्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या संविधान बंगल्याला शनिवारी 22 एप्रिलला घेराव घालणार असल्याची माहिती भारतीय दिव्यांग संघटनेचे प्रसाद साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई प्रेस क्लब येथे भारतीय दिव्यांग संघटना आणि इंडियन डेफ सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पात्राकर परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना अली यावर जंग यांनी डोनेट केलेल्या जागेवर हि संस्था उभारण्यात आली. या संस्थेमध्ये मूक बधिरांना शिक्षण मिळणे आवश्यक आहे. या संस्थेत २२० पैकी फक्त ३ मूक बधिरांना नोकरी देण्यात आली आहे. संस्थेत १२० कंत्राटी कर्मचारी असून त्यामध्ये एकाही मूक बधिर व्यक्तीला नोकरी देण्यात आलेली नाही. मूक बधिरांना शिकवण्यासाठी आवश्यक असलेली साइन भाषा येथील शिक्षकांना येत नसल्याने विद्यार्थ्यांना या शिक्षकांचा कोणताही फायदा होत नाही. संस्थेमध्ये सोशो इकॉनॉमी रिहॅबलिटेशन विभाग, आऊटरिच अँड एक्स्टेंशन विभाग आणि स्पेशल एज्युकेशन असे तीन विभाग मूक बधिरांना मदत करण्यासाठी सुरु करण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणी मूक बधिर आल्यास चांगली वागणूक मिळत नाही. संस्थेला केंद्र सरकारकडून करोडो रुपयांचा निधी येतो याची माहिती लपवली जात आहे. संस्थेमध्ये ज्यांना नोकऱ्या दिल्या आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत तक्रार करूनही तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. सीबीआयला चौकशी साठी पत्र दिले असता सीबीआयने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाकडे माहिती मागविली आहे. मात्र हि माहिती मंत्रालयाने उपलबध केली नसल्याने अद्याप चौकशी सुरु झालेली नाही. यामुळे संस्थेच्या डायरेक्टर पासून शिपायापर्यंत सर्व नियुक्त्यांची चौकशी करावी, संस्थेला आलेला निधी कुठे खर्च केला जातो यामध्ये होत असलेल्या घोटाळ्याची चौकशी करावी तसेच संस्थेमध्ये साइन भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांची भरती करावी या मागण्यांसाठी आठवले यांच्या बंगल्याला घेराव घातला जाणार असल्याची माहिती साळवी यांनी दिली. यावेळी साळवी यांच्या सोबत इंडियन डेफ सोसायटीचे पदाधिकारी व संस्थेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS