आ. बच्चू कडू यांच्या गुजरात धडकेने शेतकऱ्यांचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 April 2017

आ. बच्चू कडू यांच्या गुजरात धडकेने शेतकऱ्यांचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर


मुंबई ( शाहरुख मुलाणी ) – शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी आणि स्वामिनाथन आयोग लागू यासह अनेक मागण्यांसाठी शेतकरी आसूड मोर्च्याच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र ढवळून काढत आमदार बच्चू कडू यांनी मोदींच्या गुजरातमध्ये धडक मारल्याने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि हमीभावाची मागणी आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. 

कर्जबाजारीपणा आणि नापिकीपणामुळे देशभरात आत्महत्यासत्र सुरु असून आतापर्यंत साडेचार लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी मोदी आणि फडणवीस सरकारने हमीभावासाठी स्वामिनाथन आयोग लागू करण्याची दिलेली आश्वासने हवेतच विरली असून शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली आहे. अशा कुचकामी सरकारवर आणि त्यांच्या चुकीच्या धोरणांवर आसूड ओढण्यासाठी अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी 11 एप्रिल ते 21 एप्रिल दरम्यान शेतकरी आसूड यात्रेची घोषणा केली होती. नागपूरपासून निघालेला हा मोर्चा महाराष्ट्रातील 20 जिल्हे ढवळून काढत गुजरातच्या सीमेपर्यंत धडकला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून या मोर्च्याला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जागोजागी हजारोंच्या सभा झाल्या. प्रत्येक ठिकाणी आमदार बच्चू कडू सरकारकडून होत असलेल्या लुटीची थेअरी मांडायचे. आणि संतप्त शेतकऱ्याचा कट्टरवाद सुरू होत होता. हजारोंच्या संख्येने शेतकरी आसूड योजनेत सहभागी होत होते. आणि शेकडो गाड्यांतून हजारो शेतकऱ्यांचा निघालेला हा मोर्चा नवापूर चेकपोस्ट येथे गुजरात सीमेवर पोहोचला. मोर्च्यास परवानगी नाही आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत सुमारे 2 हजार गुजरात पोलिसांच्या उपस्थितीत अमानुष पध्दतीने हा मोर्चा अडवण्यात आला. संतप्त आमदार बच्चू कडू यांनी गुजरात सीमेवरच आंदोलन सुरु करत ठिय्या मांडला. शांततेचा मार्गाने वडनगर येथे रक्तदान करण्यासाठी निघालेली आसूड यात्रा अडवण्याचा तुम्हाला अधिकारच काय ? असा संतप्त सवाल करत जोपर्यंत मोर्च्यास परवानगी मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका घेतली. दुपारी 3 च्या सुमारास गुजरात पोलिसांनी अमानवी पद्धतीने बच्चू कडू यांच्यासह सुमारे 800 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आणि रात्री उशीरा त्यांची मुक्तता करण्यात आली. दुसऱ्या दिवशी बच्चू कडू गुजरात पोलिसांना गुंगारा देत गुजरातमध्ये घुसले आणि मेहसानामध्ये रक्तदान करत "खून लो मगर जान मत लो" हा संदेश मोदी सरकारला दिला. लाखो आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बलिदानाची मोदी सरकारला आठवण करून देण्यासाठी काढलेला हा आसूड मोर्चा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्थरावर पोहोचला असून शेतकऱ्यांच्या कट्टरवादाने सरकारच्या छातीत धडकी भरली आहे.

Post Bottom Ad