बेस्ट उपक्रमाला टाळे लावणाऱ्या कृती आरखड्या विरोधात बेस्ट सदस्यांमध्ये तीव्र नाराजी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट उपक्रमाला टाळे लावणाऱ्या कृती आरखड्या विरोधात बेस्ट सदस्यांमध्ये तीव्र नाराजी

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव -
आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला मुंबई महानगरपालिकेने आर्थिक मदत करण्याआधी कृती आरखडा सादर करण्यास सांगितले आहे. हा कृती आराखडा बेस्ट समितीस सादर करण्यात आला आहे. हा कृती आराखडा बेस्टला आर्थिक डबघाईमधून बाहेर काढणारा नसून बेस्ट उपक्रमाला टाळे लावणारा आहे अशी प्रतिक्रिया बेस्ट सदस्यांनी दिली आहे. बेस्ट प्रशासनाकडून आर्थिक आकडेवारी मागितली आहे. हि आकडेवारी जो पर्यंत समितीला सादर केली जात नाही तो पर्यंत कृती आराखड्यावर समितीच्या बैठकीत चर्चा करू देणार नाही असे सर्व सदस्यांनी सांगितले. यामुळे बेस्ट प्रशासनाने महापालिकेला व आयुक्तांना खुश करण्यासाठी बनवलेला कृती आराखडा कृतीत येण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.

मुंबई महानगरपालिकेचे अंगीकृत उपक्रम असलेल्या बेस्ट उपक्रमाची संचित तूट २१४८ कोटी रुपये इतकी आहे. बेस्टवर अनेक बँका तसेच मुंबई महापालिकेचे १६०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. बेस्टकडे येणारा महसूल कर्मचाऱ्यांचे पगार व कर्ज फेडण्यात जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यातही अडचणी येऊ लागल्या आहेत. बेस्ट आर्थिक तोट्यात असल्याने मुंबई महापालिकेकडे आर्थिक मदत मागितली आहे. गटनेत्यांच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी आर्थिक काटकसर आणि परवाश्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत काही सूचना करण्यात आल्या. त्यानुसार बेस्ट प्रशासनाने कृती आरखडा बनवला आहे. यात बेस्ट कर्मचार्‍यांचे, अधिकार्‍यांचे विविध भत्ते बंद करण्यासोबतच उत्पन्न वाढीसाठी तिकिटांच्या, पासच्या दरात वाढ करण्याचे प्रस्तावित केले आहे. बेस्टच्या जवळच्या अंतराच्या व इतर तिकिटांच्या दरात ४ रुपयांची वाढ करताना सामान्य प्रवासी, विद्यार्थी यांच्या पासच्या दरात दुप्पट वाढ करण्यात येणार आहे. एसी बसच्या प्रवाश्यांच्या तिकीट दरात १० रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने तयार केला आहे. सध्या बेस्टच्या साध्या बसचे किमान भाडे ८ रुपये आहे. हे थेट १२ रुपये करण्यात येणार आहे. मर्यादित व जलद सेवांसाठी किमान भाडे सध्या ८ आणि १0 रुपये असून हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ते थेट १२ आणि १४ रुपये होणार आहे.

बेस्ट प्रशासनाने बनवलेल्या या कृती आराखड्यामुळे बेस्ट प्रवाशी बेस्ट पासून दूर जाणार आहे. आधीच्या भाडेवाडीमुळे बेस्ट उपक्रमाच्या प्रवाश्यांची संख्या ४२ लाखावरून २९ लाख इतकी झाली आहे. नव्याने भाडेवाढ केल्यास २९ लाख असलेल्या प्रवाश्यांची संख्या आणखी काही लाखांनी कमी होणार आहे. प्रवासी बेस्टपासून दूर झाल्याने उत्पन्नावर परिणाम होणार आहे. बेस्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे विविध भत्ते बंद केले जाणार आहेत. यामुळे कर्मचारी अधिकारी यांच्यामध्ये प्रशासनाविरोधात संतप्त भावना निर्माण होऊन बेस्टच्या कामावर याचा परिणाम होणार आहे. यामुळे बेस्ट प्रशासनाने बनवलेला कृती आरखडा म्हणजे रोगा पेक्षा इलाज भारी असा असल्याने बेस्ट समिती सदस्यांनी याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना नाखूष करणाऱ्या कृती आराखड्याबाबत बेस्ट समिती सदस्य आवाज उचलणार असल्याने बेस्ट समितीच्या बैठकीत बेस्ट प्रशासन आणि सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी होणार आहे.  

दरम्यान बेस्टच्या तिकिटांमध्ये वाढ होणे अपेक्षित होते; परंतु अनेक कारणांमुळे ते वाढवण्यात आले नाही. इंधनाचे दर, सुट्या भागांच्या किमती, आस्थापना खर्च यांच्यात मोठी वाढ झाली. दोन वर्षांपूर्वी बेस्टने तिकीट दरांत वाढ केली असली, तरी ती पुरेशी नव्हती. त्यामुळे सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी ही दरवाढ प्रस्तावित केल्याचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

बेस्टच्या आराखड्यातील काटकसर आणि उपाययोजना - 
१ एप्रिल २०१७ पासून महागाई भत्ता गोठवणे, ‘ब’ श्रेणीतील अधिकाऱ्यांचा कार्यभत्ता, प्रवास भत्ता, वैद्यकीय भत्ता खंडित करणे, उपक्रमाच्या तांत्रिक ब श्रेणीतील अधिकाऱ्यांकरता विद्युत वितरण कार्यक्षम भत्ता, रजा प्रवास सहाय भत्ता, गृहकर्जावरील अर्थसहाय, दूरध्वनी देयकांची बिले, शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या पाल्यांच्या वह्या, पुस्तके खरेदीवर आर्थिक मदत, शिष्यवृती योजना खंडित करणे, उपहारगृहाच्या कंत्राटदाराला देण्यात येणारे अर्थसहाय बंद करणे, वेतनश्रेणी आणि अन्य भत्ते इत्यादींच्या पुनर्रिक्षणाच्या बाबतीतील करार आहे तसाच २०२१ पर्यंत पुढे सुरु ठेवणे, ‘अ’ श्रेणीतील आस्थापनेवरील 25 पदे रद्द करणे, नियमित होणाऱ्या विविध पदांच्या भरतीला स्थगिती, सेवा सातत्य व कामांचे मूल्यांकन करून सेवा समाप्तीची योजना लागू करण्यात येणार, विद्युत पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीतील सुधारणा, ऊर्जा खरेदी कराराबाबत वाटाघाटी लेखा पद्धतीत सुधारणा, खरेदी प्रक्रीयेत सुधारणा, बस मार्गाचे सुसूत्रिकरण, बसताफ्यांची पुनर्रचना, वातानुकूलित बससेवा बंद करणे, भाडेतत्त्वावर बसगाड्या घेणे, प्रवास भाडयांची पुनर्रचना, बस पास दरात वाढ, विद्यार्थ्यांच्या बसपास दरात दुप्पट वाढ, आनंदयात्री योजना रद्द करणे, सेवा निवृत कर्मचाऱ्यांच्या बसपास दरात दुप्पट वाढ, पत्रकारांच्या बसपासदरात सहापट वाढ

प्रवासी भाडेवाढ - 
किमी      साधारण             मर्यादित                  जलद    
        सध्याचे प्रस्तावित सध्याचे प्रस्तावित सध्याचे प्रस्तावित
२      0८     १२      0८     १२        १0     १४
४      १0     १४      १0     १४        १४     १८
६      १४     १८      १४     १८        १८     २२
८      १६     २0      १६     २0        २0     २४
१0     १८     २२      १८     २२        २२     २६
१२     २0     २४      २0     २४        २४     २८
१४     २२     २६      २२     २६        २७     ३१
१७     २४     २८      २४     २८        ३0     ३४
२0     २६     ३0      २६     ३0        ३२     ३६ 
२५     २८     ३२      २८     ३२        ३७     ४१
३0     ३0     ३४      ३0     ३४        ४२     ४६

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages