पनवेल: २६ एप्रिल -
भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्र पक्षांची पनवेल महापालिकेतही मोलाची साथ लाभेल, असा विश्वास व्यक्त करत आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपाचे मित्र पक्ष वेगळी चुल मांडण्याची शक्यता साफ फेटाळून लावली. मित्र पक्षांपैकी रिपाई आमच्या सोबत असून शिवसेनेसोबत युतीची चर्चाही अंतिम टप्प्यात आहे. इतर मित्र पक्षांबाबत भाजपाचे प्रभारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत अगोदर चर्चा करून येत्या दोन ते तीन दिवसांतच राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटनेच्या नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित करणार असल्याची माहितीही ठाकूर यांनी दिली.
राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्रितपणे पनवेल महापालिकेतील सर्व जागा लढवणार असल्याच्या बातम्या माध्यमांमधून चर्चिल्या जात आहेत. याकडे लक्ष वेधले असता, या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसून राज्यात आमच्या सोबत असलेले हे पक्ष पनवेलमध्येही आमच्यासोबतच राहतील असा विश्वास मा. ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात सत्तेत आल्यास सत्तेतील वाटा देण्याचे वचन भाजपाच्या नेतृत्वाने या मित्रपक्षांना दिले होते. हे वचन आमच्या राज्यातील नेतृत्वाने पाळल्याने आमच्या कोणत्याही मित्रपक्षाची कुठलीच तक्रार नाही. त्यामुळेच पनवेल महापालिकेतही या सर्व मित्र पक्षांकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसादच मिळेल,असेही ते म्हणाले. किंबहुना रिपाईचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी तर आमच्या सोबत कामालाही लागले असल्याकडे लक्ष वेधत मा. ठाकूर म्हणाले की, येत्या दोन तीन दिवसांत इतर मित्र पक्षांसोबतही चर्चा केली जाईल. त्यांची भुमिका नेमकी काय आहे, हे जाणून घेतल्यानंतर त्याबाबत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगत मित्र पक्षांच्या सोबतीनेच भाजप निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली.