
मुंबई - बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती खराब आहे. बेस्टला मुंबई महापालिकेकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. त्यासाठी बेस्टने कृती आराखडा सादर केला असला तरी आराखडा मंजूर झाला नसल्याने बेस्टला आर्थिक मदत मिळालेली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नसल्याने मुंबई महापालिकेच्या विविध कार्यालयांनी बेस्टची थकवलेली बिले तातडीने भरा, असे आदेश पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी सोमवारी पालिकेच्या प्रमुख लेखापालांना दिले. बिले जमा केल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यासही त्यांनी सांगितले आहे. मुंबई महापालिकेने बेस्टचे तब्बल ११ कोटी ३८ लाख ९८ हजार २५७ रुपये थकवले आहेत.
बेस्ट उपक्रम सध्या आर्थिक संकटात सापडला असून, यातून बाहेर काढण्यासाठी महापौरांच्या दालनात बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी कृती आराखडा सादर केला आहे. पालिकेचे आयुक्त आणि बेस्ट उपक्रमाचे माजी महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांच्या उपस्थितीत या आराखड्यावर चर्चा झाली. पण बेस्ट उपक्रमाने ठोस कृती केल्याशिवाय महापालिका आर्थिक सहाय्य करणार नाही, अशी आयुक्तांनी भूमिका घेतली आहे. तर बेस्ट समितीच्या सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कोणकोणत्या खात्यांकडे तसेच मुंबई पालिकेच्या विविध खात्यांकडे बेस्टची किती आर्थिक देणी थकली आहेत, याची आकडेवारी उपक्रमाकडून मागितली होती. बेस्ट प्रशासनाने समितीच्या सभेत ही आकडेवारी सादर केल्यानंतर राजा यांनी पालिका आणि बेस्ट प्रशासनाला धारेवर धरले. पाच लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेली केंद्र आणि राज्य सरकारची विविध खाती आणि मुंबई पालिकेची विविध खाती आणि विविध वॉर्डांकडे थकलेली रक्कम तब्बल ११ कोटी ३८ लाख ४३ हजार ४८६ रुपये इतकी आहे.
यापैकी सर्वाधिक थकबाकी एफ/उत्तर या वॉर्डात सहा कोटी ८५ हजार ८३३ रुपये आहे. तर याच वॉर्डात ३३ 'केसेस्' दाखल झाल्या आहेत. पालिकेची विविध खाती आणि ज्या वॉर्डांनी ही थकबाकी अद्यापि भरलेली नाही, ती त्वरित बेस्टकडे जमा करण्याचे आदेश आयुक्तांनी बजावले आहेत. पालिकेच्या २४ वॉर्डांतील कार्यालयांमध्ये लेखापालांचे खाते आहे. पालिका मुख्यालयातील प्रमुख लेखापालांनी वॉर्डांमधील लेखापालांना ही थकबाकी भरण्याचे आदेश द्यावेत आणि त्याचा कार्यपूर्तता अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
महापालिकेच्या विविध वॉर्डांकडील थकबाकी('केसेस्')ए : ८६ लाख ९५ हजार ७३८ रु./(४)
बी : १0 लाख ३९ हजार ४६५रु./(१)
सी : आठ लाख तीन हजार ९८८रु./(१)
डी : ५0 लाख ५८ हजार ७४६ रु./(५)
ई : एक कोटी पाच लाख ७४ हजार ८९0रु./(१0)
एफ उत्तर : सहा कोटी ८५ हजार ८३३ रु./ (३३)
एफ दक्षिण : एक कोटी १४ लाख ६९ हजार २४१ रु./(६)
जी उत्तर : एक कोटी ४५ लाख ७७ हजार ९९४ रु./(९)
जी दक्षिण : १५ लाख ९२ हजार ३६२ रु./(२)
एकूण : ११ कोटी ३८ लाख ९८ हजार २५७ रुपये.

No comments:
Post a Comment